सुप्रिया सुळे उपस्थित राहणार
५० हजार महिलांची उपस्थिती अपेक्षित
राणी लंके गुरुवारी अर्ज दाखल करणार !
पारनेर : प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई नीलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २४ ऑक्टोबर रोजी गुरूपुष्यांमृताचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून अर्ज दाखल करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित राहणार आहेत. ५० हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये पारनेरच्या तहसिल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूकीची चाहूल लागल्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत मतदारसंघात बराच खल सुरू होता. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या वतीने पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे व नगर तालुक्यातील मा. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पारनेर-नगर मतदारसंघाची जागा हवी अशी मागणी केली होती. तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादीने या जागेवर आपला हक्क कायम ठेवत या जागेवर खा. नीलेश लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या मा. सदस्या राणीताई लंके देण्यात आली. उमेदवारी निश्चित झाल्याने गुरूपुष्यामृताचा मुहूर्त साधत गुरूवारी राणीताई लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
▪️चौकट
बाजारतळावर सभा
सकाळी १० वाजता पारनेर शहरातील महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळयापासून रॅलीस प्रारंभ होऊन मुख्य बाजारपेठेतून ही रॅली तहसिल कार्यालयामध्ये पोहचेल. तिथे उमेदवार राणीताई लंके व इतर पाच महिला आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहेत. अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर पारनेर शहरातील बाजार तळावर सभेचे आयोजन करण्यात आल्याचे राणीताई लंके यांच्या संपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले.
▪️चौकट
महिलांचे शक्तीप्रदर्शन
राणीताई लंके यांच्या रूपाने प्रथमच पारनेर-नगर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व एक महिला विधानसभेत करणार आहे. महिलांसाठी ही अभिमानाची बाब असून म्हणूनच राणीताई यांचा अर्ज दाखल करण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावातील सुमारे पन्नास हजार महिला उर्स्फुर्तपणे पारनेरात दाखल होणार आहेत. या महिला रॅलीने तहसिल कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत.
सुवर्णा धाडगे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला आघाडी
पुनम मुंगसे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेस
▪️चौकट
खा.सुप्रियाताई सुळे उपस्थित राहणार !
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अपेक्षाप्रमाणे पहिल्याच उमेदवारी यादीत राणी लंके यांचे नाव घोषित झाल्याने तालुक्यात जल्लोष निर्माण झाला.गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर गुरुवारी राणी लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या शक्तीप्रदर्शनासाठी मतदारसंघातून सुमारे ५० हजार महिला उपस्थित राहणार आहेत. हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रियाताई सुळे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती खा. नीलेश लंके यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. खा.सुळे यांचा अधिकृत दौरा बुधवारी उशिरा जाहीर झाला आहे.