रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी च्या पुढाकारातून १००० गरजू मुलींसाठी मोफत गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम.

अहमदनगर : रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी, कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन (CPAA) यांच्या संयुक्त विद्यमाने व SK AVAM चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्यातून वय वर्ष ९ ते १८ वयोगटातील १००० गरजू मुलींसाठी मोफत गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधात्मक HPV लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम गुरुवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी सारडा कॉलेज येथे आयोजित करण्यात आली आहे. 

गर्भाशयमुख कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा एक प्रमुख कर्करोग असून, योग्य वेळी प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यास तो पूर्णतः टाळता येऊ शकतो. HPV (Human Papillomavirus) लस ही गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षण करणारी प्रभावी लस आहे. ही लस मुलींना त्यांच्या बालपणी दिल्यास भविष्यातील कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी च्या माध्यमातून १००० गरजू मुलींना मोफत लसीकरण करून त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी मोठा योगदान देण्यात येत आहे.

ही मोहीम समाजातील गरीब कुटुंबांतील मुलींना लसीकरणाची संधी देत असून, प्रत्येकी ₹२५०० किमतीच्या एकूण ₹२५ लाख किमतीच्या लसी दिल्या जाणार आहेत. लसीकरणासाठी मुलींना पूर्व नोंदणी करणे आवश्यक असून पूर्व नोंदणी केल्याशिवाय लसीकरण दिले जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. नोंदणीसाठी पालकांचे संमतीपत्रासह मुलीचे आधार कार्ड व पिवळा किंवा केशरी शिधापत्रिकेची झेरॉक्स द्यावी लागेल.

लसीकरणच्या पूर्व नोंदणी करीता आवश्यक अर्ज कापड बाजार येथील सिमरतमल कुंदनमल (SK) ज्वेलर्स येथे उपलब्ध असून पूर्व 

नोंदणीसाठीचे फॉर्म येथेच दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ पूर्वी भरून जमा करावेत.

या मोफत लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी मुलींमध्ये व पालकांमध्ये सदर कर्करोग व त्याचे दुष्परिणाम तसेच सदर लसीचे फायदे बाबत जनजागृती करणे कामी नगर शहरातील विविध शाळेत मार्गदर्शन पर शिबिर रोटरी प्रियदर्शिनीच्या सदस्य व प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ स्मिता तारडे यांच्या मार्फत घेण्यात येत आहेत.

या लसीकरण मोहिमेबद्दल बोलताना रोटरी क्लबच्या अध्यक्षा रो. मिनल ईश्वर बोरा यांनी सांगितले की, “ही मोहीम मुलींना सुरक्षित व निरोगी भविष्य देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आपला आजचा एक छोटा प्रयत्न आपल्या मुलीला कर्करोगापासून मुक्त करू शकतो.” तसेच याकामी अधिक माहितीसाठी व कोणतीही मदत लागल्यास ९३७०७७६०५८ / ९८२३७९९९९८ या नंबर वर संपर्क करण्याचे आव्हान त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *