केडगावमधील नेत्र शिबीरात १ हजार २०० रुग्णांची तपासणी
प्रा . गाडे : नगरमधील ताबेमारी गाडण्यासाठीच महाआघाडी मैदानात
केडगाव : नगर शहर व उपनगरात वाढत चाललेली ताबेमारी चिंतेचा विषय बनला आहे . गोरगरीब जनतेने कष्टाने कमावलेल्या संपत्तीवर डोळा ठेऊन नगर शहरातील काही गुंडाची टोळी राजरोसपणे ताबामारी करीत आहे . या गुंडाना कोणाचा राजकीय वरदहस्त आहे हे नगरकरांना माहिती आहे , मात्र आता महाआघाडी नगर शहरातील ताबामारी समुळ उखडुन टाकणार आहे असे प्रतिपादन जिल्हा शिवसेनाप्रमुख ( ठाकरे गट ) प्रा . शशिकांत गाडे यांनी केले .
शिवसेना नगर शहर आणि योगिराज गाडे मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने केडगाव येथील भैरवनाथ मंदिरात अकरावे मोफत नेत्र तपासणी शिबिर रविवार दि .२२ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. सुमारे १ हजार २०० हून अधिक नागरिकांनी नेत्र तपासणी करून मोफत चष्मे घेतले. या उपक्रमामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांना नेत्रतपासणीच्या माध्यमातून मदत मिळाली आहे, आणि त्यामुळे आता अधिकाधिक नागरिक सजग होत आहेत.
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आणि विनोदाने म्हटले की, “आता सर्वांचे डोळे उघडले आहेत, आणि त्यांना जमिनी बळकावणे, गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराच्या घटना स्पष्टपणे दिसत आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत नागरिक एक चांगले आणि पारदर्शक नेतृत्व पाहतील, जे शिवसेना आणि महाविकास आघाडीचं येणार आहे.”
या शिबिरात माजी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, महाराष्ट्र राज्य युवासेना उपसचिव विक्रम राठोड, माजी नगरसेवक अमोल येवले, माजी नगरसेवक संग्राम कोतकर, डॉ. श्रीकांत चेमटे, रावसाहेब भाकरे महाराज, संजय गारुडकर, महादेव कोतकर, युवा नेते ओंकार सातपुते, पप्पू ठुबे, रावसाहेब नांगरे, पप्पू भाले, सुनील सातपुते, देविदास मोढवे, मुन्ना भिंगारदिवे, ओंकार गारुडकर, प्रकाश कुलट, राजेंद्र भगत, राज गोरे, वैभव सांगळे, प्रथमेश महिंद्रकर आणि परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रा. गाडे पुढे म्हणाले, दृष्टिदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. या शिबिराच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मोफत चष्मे आणि नेत्रचिकित्सा मिळाल्याने त्यांच्या जीवनात प्रकाश आला आहे. शिवसेना महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली शहरात आता योग्य निर्णय आणि प्रगती दिसेल. माजी नगरसेवक योगिराज गाडे यांनी सर्वांचे आभार मानले .