सारोळा कासार येथे ३.८९ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण, ८.५ कोटींच्या नविन कामांना मंजुरी ;
अहिल्यानगर :
साकळाई सिंचन योजनेची दोन आठवड्यांत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून ही दीर्घकाळ प्रलंबित योजना आपल्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास नेण्यात येईल, असे ठाम आश्वासन पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासार येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ३.८९ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, सुमारे २,००० कोटी रुपये खर्चाचा साकळाई सिंचन प्रकल्प ४० हून अधिक गावांना लाभदायक ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत २ टीएमसी क्षमतेचा जलसाठा निर्माण केला जाणार असून त्यामुळे नगर तालुक्यातील कायमस्वरूपी पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायमचा मार्गी लागेल.
यावेळी सारोळा कासार गावासाठी खालील विकासकामांना पालकमंत्र्यांनी मंजुरी दिल्याची माहिती देण्यात आली –
• २ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम
• बेंद वस्ती व होल विहीर पाझर तलावाच्या भिंतीचे काँक्रिटीकरण व मजबुतीकरण
• भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व सिद्धार्थ नगर येथील बुद्ध विहाराचा विकास
• छत्रपती चौक–खडकी रस्ता, कानिफनाथ मंदिर–काळे मळा व कानिफनाथ मंदिर–दरे मळा येथे स्ट्रीट लाईट बसविणे
• वाड्या – वस्ती येथे सोलर स्ट्रीट लाईट
• गट नं 1/अ /1 जागा ग्रामपंचायतकडे वर्ग करून त्या जागेवर क्रीडा संकुल, जॉगिंग पार्क व शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी
• नदीकाठच्या रस्त्याचे मजबुतीकरण
• घोसपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सौर प्रकल्प
• बारे मळा ते खडकी सुमारे २.५ किमी नवीन रस्ता
उद्घाटनप्रसंगी सरपंच आरती कडूस व माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस यांनी पालकमंत्री विखे पाटील व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास दिलीपजी दाते, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीपजी भालसिंग, तालुकाध्यक्ष दिपकजी कार्ले, भाऊसाहेब बोठे, अनिलजी करांडे, संजयजी कार्ले, संजयजी गिरवले, अभिलाषजी घिगे, रंगनाथ निमसे, प्रतिकजी शेळके व सारोळा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी “भारत माता की जय” व “जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.


