आरोग्य ग्राम जखणगांवच्या आरोग्य दिंडीमध्ये यंदा भाविकांच्या गर्दीचा उच्चांक

आरोग्य ग्राम जखणगांवच्या आरोग्य दिंडीमध्ये यंदा भाविकांच्या गर्दीचा उच्चांक

 सालाबाद प्रमाणे यंदाही आरोग्य ग्राम जखणगाव तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर येथून श्री क्षेत्र पंढरपूर साठी एक दिवसीय आरोग्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यंदाचे हे दिंडी सोहळ्याचे पंधरावे वर्ष आहे .यंदा भाविकांची उत्सुकता व आतापर्यंत दिंडीतील नियोजनाचा उत्कृष्ट अनुभव या जोरावर अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागातून तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतील सुमारे ७०० भाविक या दिंडीमध्ये सहभागी झाले होते .जखणगाव , हिंगणगाव , नागापूर, पिंपळगाव माळली व अहिल्यानगर शहराच्या विविध ऊपनगरातुन १४  लक्झरी बसेस आणि स्लीपर कोचने निघालेली ही दिंडी प्रथमतः आत्माराम बाबांच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र मांदळी येथे थांबली. सर्व भक्तांनी मनोभावे, आत्माराम बाबांच्या मंदिरात जाऊन बाबांचे दर्शन घेतलं व तेथील संयोजकांच्या वतीने नाश्त्याच्या आयोजनाच्या आस्वाद घेऊन पुढे मार्गस्थ झाली. देशाचं भूषण व राज्याचा अभिमान राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी ही दिंडी श्री क्षेत्र चौंडी येथे पोहोचली .तेथे उभारण्यात आलेल्या सृष्टीचे निरीक्षण करून पुरातन महादेवाच्या मंदिरात दर्शन झाल्यावर देवीची मनोभावे पूजा करण्यात आली.पुढे दिंडी करमाळा येथील कमलादेवी मंदिरामध्ये देवीची यथासांग पूजा करण्यासाठी थांबली .तेथेच असणाऱ्या महामुनी मंगल कार्यालयामध्ये सर्व दिंडीकरांची मध्यान भोजनाची व्यवस्था प्रवचन व भजन झाल्यावर करण्यात आली‌ धाराशिव जिल्ह्यातील आलेश्वर गावच्या भक्तांनी या दिंडीच्या मध्यान भोजनाच्या व्यवस्थेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला .पुढे ही दिंडी पंढरपुरातील खेडेकर मठामध्ये थांबली व तिथून पाई वारी करत चंद्रभागेच्या वाळवंटात पोहोचली. भक्तांची चुकामुक होऊ नये व आपल्या दिंडीतील भक्त ओळखता यावा या दृष्टीने प्रत्येक भक्ताला संयोजकांच्या संकल्पनेतून एक भगवी मंचरी टोपी देण्यात आली. त्या टोपी मुळे जसा बगळ्यांचा थवा उतरावा त्याप्रमाणे भगव्या टोपीवाल्यांचा थवा पंढरपुरात दाखल झाला. एक किलोमीटर लांबच लांब रांग असलेल्या या दिंडीची भव्यता पाहून पंढरपुरात दाखल झालेले सर्व भाविक, प्रशासकीय अधिकारी व पोलीस कर्मचारी उत्सुकतेने दिंडी पाहतच बसायचे. परिणामी सर्वांनी आदराने या दिंडीच्या मार्ग मोकळा करण्यासाठी सहकार्य केले.या दिंडीची चर्चा पंढरपुरात होऊ लागली.लोक आदराने व उत्सुकतेने दिंडीतील भाविकांची विचारपूस करत होते.पंढरपुरातील वाळवंटात हा दिंडी सोहळा विशेष आकर्षण ठरला .अनेक मागे राहिलेले भक्त जेव्हा वाळवंटातील दगडी फुलावर आले व त्यांनी नदीच्या काठावर भगव्या टोप्यांचा थवा पाहिला तेंव्हा ते आपले दिंडी सापडल्याचा आनंद लपवू शकले नाहीत. चंद्रभागेमध्ये स्नान करून त्याच स्वच्छ वाळवंटात चंद्राच्या आणि चांदण्यांच्या प्रकाशात सर्व भाविकांनी रिंगण सोहळा व हरीपाठाचा वेगळा अनुभव घेतला .मोठे रिंगण करून सर्व भाविक आनंदाने पावल्या खेळत होते . एकादशीच्या रात्री मंदिर प्रदक्षिणा पार पाडण्याच्या उद्देशाने बरोबर अकरा वाजता रात्री दिंडी पुंडलिकाचे दर्शन करून मंदिर प्रदक्षिणेला मार्गस्थ झाली .पुंडलिक मंदिराला प्रदक्षिणा, नामदेव पायरी दर्शन व विठ्ठलाच्या मंदिराला संपूर्ण प्रदक्षिणा करून रात्री एक वाजता दिंडी पुन्हा वाळवंटात येऊन थांबली. विखुरलेले भाविक प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना एकच गोष्ट विचारत होते भगव्या टोपीवाल्यांची दिंडी कुठे असेल. सर्वांनी विशेष आकर्षण ठरलेले कर्मचारी दिंडीची संभाव्य जागा चुकलेल्या भाविकांना सांगून बरोबर सगळे भावी त्या वाळवंटाच्या कडेला जमा झाले .पुन्हा पाई वारी करत ही दिंडी दोन वाजता खेडेकर आश्रमापाशी पार्किंग व्यवस्थेत लावलेल्या आपल्या बसेसच्या ठिकाणी आली. पहाटे सूर्योदयापर्यंत सर्व भाविक आपापल्या घरी पोहोचलेले होते .सर्व सुखरूप घरी पोहोचण्याचा आनंद सर्व संयोजकांना झाला. या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे शास्त्र ,विज्ञान व अध्यात्म यातून एकादशीचे आरोग्यदायी महात्म्य ,पायी वारीचे शारीरिक मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम याबद्दल या दिंडीचे संयोजक व आरोग्य ग्राम जखणगावचे आदर्श सरपंच डॉक्टर सुनील गंधे यांनी दिंडीच्या मार्गात अनेक वेळा दिंडी चा हेतू,परिणाम याविषयी प्रबोधन पर व्याख्यान प्रवचन व संदर्भीय दृष्टांत दिले.वाळवंटात प्रदक्षिणेपूर्वी सर्वांनी आपल्या घरून आणलेल्या शिवरायांचा व संयोजन समितीने दिलेल्या अल्पप्रसादाचा गोपाळकाला करून अंगत पंगत झाली .दिंडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अनेक सुशिक्षित व सुज्ञ भाविक सहभागी झाले होते. उच्चशिक्षित, उच्चभ्रू ,उच्च पदस्थ अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, प्राध्यापक, अधिकारी, पदाधिकारी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते .महिलांची संख्या निश्चितच पुरुषांपेक्षा अधिक होती. अनेक आजाराने पीडित भाविक सुद्धा या अकरा किलोमीटरच्या पायी दिंडीत पूर्णपणे पायी चालले. समुदायशक्ती व देवाला भेटण्याच्या प्रेरणेने आपण ही गोष्ट शक्य केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. एकूणच जखणगावच्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून पंधरा वर्षांपूर्वी सुरू झालेली ही दिंडी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील एक नामांकित दिंडी म्हणून पंढरपूर मध्ये प्रसिद्ध आहे .याविषयी बोलताना या दिंडीचे संयोजक डॉ. सुनील गंधे म्हणाले कि या दिंडीचे मुख्य उद्दिष्ट यात सहभागी झालेल्या भाविकांनी पुढील आषाढी पर्यंत किमान आपण करत असलेले एक वाईट कृत्य सोडून यावर्षी एक नवीन चांगलं समाजहितासाठी काम करण्याचा मानस ठेवावा.खरे तर भक्ती मार्ग माणसांच वैराग्य जागृती करून स्वार्थ भावना सोडण्यासाठी आहे.परंतु आजकाल यातही स्वार्थ व दंभ जाणवतो .यामुळे या आगळ्यावेगळ्या  दिंडीचा तरी गुण येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उत्तम नियोजन, अत्यल्प खर्चात अनेक प्रेरणादायी क्षेत्रांना भेटी, शुद्ध पाणी व सात्त्विक भोजनाची अचुक वेळी व्यवस्था, प्रत्येक उपक्रमाच शास्त्रीय प्रयोजन समुजन सांगितले गेल्याने अंधश्रद्धा निर्मूलन यामुळे ही दिंडी चिरस्मरणीय ठरल्याची भावना अनेक भक्तांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *