आदर्शगाव हिवरेबाजार येथे एनसीसी छात्रांना पदोन्नती
नगर (प्रतिनिधी) :छात्र सेनेमुळे राष्ट्रभक्तीची गोडी निर्माण होते. विद्यार्थीदशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये स्वंयशिस्त व एकता या गुणांची बीजे रोवण्यास मदत होण्याबरोबरच राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये मिळालेले अनुभव व प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यालयीन जीवनापासूनच राष्ट्रभक्तीची गोडी निर्माण होण्यास मदत झाली, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ पोपटराव पवार यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आदर्शगाव हिवरेबाजार मधील यशवंत माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना, १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी विभागातर्फे ‘रँक डिस्ट्रीब्यूशन’ कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परीषदेचे जलसंधारण अधिकारी मनोज ढोकचौळे . गावातील आजी माजी सैनिक, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पद्मश्री डॉ पोपटराव पवार यांनी सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासाठी छात्रांनी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले. राष्ट्रीय छात्र सेना शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनण्यासाठी आवश्यक गुण वाढीस लागून त्यांच्या सुप्त गुणांचा विकास होतो, असे मत व्यक्त केले. छात्र सेनेमध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. एनसीसी मुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण वाढीसाठी निर्माण होणाऱ्या क्षमतेबद्दल मार्गदर्शन केले.
एनसीसी छात्रांना प्रेरणा मिळावी व त्यांच्याकडुन देशसेवा घडावी या हेतूने छात्रांना रँक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी रितुजा ठाणगे-कंपनी सार्जंट मेजर, तन्मय पादीर- कंपनी क्वार्टर मास्टर,गौरव ठाणगे- सार्जंट, श्रुती ठाणगे- कार्पोरल, किरण ठाणगे, सारंग उरमुडे आणि अक्षय वाबळे यांना लान्स कार्पोरल रँक प्रदान करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुरलीधर अमृते, दिपक ठाणगे, कैलास खैरे, सीटीओ नंदकुमार झावरे,पी.आय. धर्मराज ठाणगे, मंगेश ठाणगे मेजर, नीता सोनवणे उपस्थित होते .