कांदा निर्यात धोरण विरोधात नगरमध्ये शिवसेनेचे आंदोलन
अध्यादेशाची होळी करत उग्र आंदोलन करण्याचा इशारा
नगर तालुका प्रतिनिधी- कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारणीचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा असून हा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा, अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना उप जिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या निर्यात धोरण आदेशाची होळी करत आंदोलन करण्यात आले.
कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारणीचा केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध अहमदनगर बाजार समिती च्या नेप्ती उपबाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले.केंद्र सरकारच्या निर्यात धोरण आदेशाची यावेळी होळी करण्यात आली.तसेच सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कांदा आमच्या घामाचा, नाही कुणाच्या बापाचा, कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. केंद्र सरकारचा कादा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा ठरणार आहे.हा निर्णय केंद्र सरकारने तातडीने मागे घ्यावा.यावेळी माजी सभापती रामदास भोर, पोपट निमसे, प्रकाश कुलट, भाऊ बेरड, दत्ता झरेकर यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवी मोरे,बच्चू मोढवे व कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.