नगर – सोलापूर महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात..
देविदास गोरे
रुईछत्तिशी – नगर – सोलापूर महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुलांचे देखील काम प्रगतीपथावर आहे. महामार्गावरील पुलांचे काम चालू असल्याने महामार्ग सुरु होण्यास विलंब होत आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असल्याने जोमाने सुरु आहे या मार्गावरील सर्वात मोठा पूल हा सिना नदीवरील आहे. सीना नदीवरील पुलाचे काम पूर्णत्वाकडे जात असून मुरूम भराईचे काम सुरु आहे.नगर सोलापूर महामार्ग हा नगर शहरासह ग्रामीण भागातील विकासात भर पाडतो आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना शहराच्या ठिकाणी कमी वेळेत जाण्यासाठी हा महामार्ग कामधेनु ठरणार आहे.महाविद्यालयीन विद्यार्थी , रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी हा महामार्ग वेगवान ठरणार आहे.मार्गावरील पुलांवर दोन्ही बाजूंनी विजेची सोय करण्यात आली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर लखलखाट होणार असून नवीन वर्षात महामार्गाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
मांदळी , पंढरपूर , अक्कलकोट , गाणगापूर ही देवस्थाने महामार्गाच्या पल्ल्यामुळे प्रकाशझोतात येणार आहेत.पुढील वर्षी होणारी पंढरीची वारी याच मार्गावरुन जाणार असल्याने वारकऱ्यांच्या पाऊलखुणा देखील महामार्गाचे वैभव वाढविणार आहे.नगर सोलापूर मार्गाचा पहिला बाह्यवळण रस्ता रुईछत्तिशी येथून जात असल्याने वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे.रस्त्याच्या मधोमध लावण्यात आलेली वृक्षवेली बहरली असून प्रवाशांना आकर्षण ठरत आहे. महामार्गाचे काम अतिशय वेगाने सुरु असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर लोकार्पण केले जाईल अशी माहिती नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी दिली आहे.