शासन आपल्या दारी ऐवजी शासन आपल्या बांधावर अभियान सुरु करा..*
देविदास गोरे.
रुईछत्तिशी – सध्या पाऊस लांबणीवर गेला असल्याने सरकारने शासन आपल्या दारी अभियान बंद करुन शासन आपल्या बांधावर हे अभियान सुरु करावे. शासन आपल्या दारी अभियानांतर्गत अनेक शासकीय योजना मार्गी लावण्याचे सरकारचे धोरण आहे पण तर आता मागे ठेऊन सध्या शासन आपल्या बांधावर हे अभियान सुरु करण्याची मागणी नगर तालुका व रुईछत्तिशी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.खरिपाची पिके पूर्णपणे हाताबाहेर गेली आहेत आता कितीही पाऊस आला तरी पिकांच्या उत्पादन क्षमतेवर मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे राज्य सरकारने यावर ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे.कापूस , मका , बाजरी , सोयाबीन , कांदा या खरीप पिकांची पाहणी महसूल व कृषी विभागाने बांधावर जाऊन करावी.शेतकऱ्यांना एकरी अनुदान जाहिर करावे अशी मागणी या भागातून जोर धरु लागली आहे.आमदार निलेश लंके , आमदार बबनराव पाचपुते , आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विधिमंडळात याविषयी आवाज उठवून शेतकऱ्याच्या हिताचा विचार करावा. महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यात आले होते. सत्ताधारी सरकारने देखील बाकी विकास कामांचा दिंडोरा न पिटवता अनुदान जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील रहावे. जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.जनावरांची संख्या मोजून चारा डेपो अन्यथा चारा छावण्या सुरु करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजनची आढावा बैठक घेऊन प्रथमदर्शनी शेतकऱ्यांच्या समस्या विचारात घ्याव्यात अशी चर्चा जोर धरू लागली आहे.शेतकरी जगला तर बाकी जीवनमान सुरळीत होणार आहे त्यामुळे सरकारने शासन आपल्या दारी अभियान थोडे बाजूला ठेऊन शासन आपल्या बांधावर पाठवा अन्यथा येणाऱ्या निवडणूकीत शासन आपापल्या घरी हा संदेश घेऊन बळिराजा बाहेर पडणार आहे.एकीकडे डिजिटल इंडियाची घोषणा होत असताना शेतकरी पूर्णपणे कोसळून चालला आहे याची जाणीव सरकारने ठेवावी व खरीप पिकांना अनुदान जाहीर करावे तरच शेतकरी वर्ग तग धरुन राहणार आहे.