रुईछत्तिशी परिसरात नागरिक व जनावरे यांची पाण्यासाठी वणवण..
पाऊस नसल्याने जनजीवन विस्कळित…
(देविदास गोरे )
रुईछत्तिशी – रुईछत्तिशी परिसरात शेतकऱ्यांना दैनंदिन वापरासाठी विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. रुईछत्तिशी व शेजारील गावांना बुऱ्हाणनगर पाणी योजनेतून पाणी पुरवठा होतो प दारंतु नगर सोलापूर मार्गाचे काम चालू असल्याने या योजनेची अवस्था बिकट झाली आहे. पंधरा दिवसातून एकदा पाणी सुटत असल्याने या भागातील नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे. महामार्गावरील गावे असून कोणताही लोकप्रतिनिधी या भागाची समस्या जाणून घेण्यास तयार नाही.नगर दक्षिणेचे विद्यमान खासदार व श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दोन्हीही सत्तेत असून शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची समस्या जाणून घेण्यास कोणीही तयार नाही.गेल्या महिन्यापासून पाऊस लांबणीवर गेला आहे.पिके मातीमोल होऊन शेतकरी मोठया आर्थिक अडचणीत सापडला आहे. पिकांचे पंचनामे करण्याची गरज आहे.कोणताही महसूल अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर आलेला नाही.राज्य सरकारने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पाण्याची समस्या बिकट होऊन बसली असताना लोकप्रतिनिधी यांनी केलेले दुर्लक्ष नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
पाऊस आला नाहीतर खरीपाची पूर्ण पीके मातीमोल होऊन शेतकरी कोसळून जाणार आहे. राज्य सरकारने तात्काळ पंचनामा करण्यासाठी जिल्हा स्तरावर आढावा बैठक घ्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.एकीकडे पिके पावसाअभावी संकटात तर दुसरीकडे नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही यामुळे रुईछत्तिशी परिसरात दुष्काळाचे सावट पहायला मिळत आहे. शाळा , महाविद्यालयात देखील पिण्यासाठी पाणी नसल्याने विद्यार्थी आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जनावरांचा चारा व पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची चिन्हे आहेत.खरिपाची पिके पावसाअभावी मातीमोल झाली तर शेतकरी पूर्णपणे कोसळून जाणार आहे.
“पाऊस नसल्याने खरिपाची पिके पूर्णपणे मातीमोल होतील.सध्या पिकांना पावसाची खूप गरज असून पिके ऐन उभारीत असताना पावसाने मारलेली दडी चिंतेचा विषय बनला आहे.
रविंद्र अमृते , आदर्श शेतकरी , वाटेफळ.