मिळालेल्या मानधनातून सरपंचाने भागविली गावाची तहान.
तीस महिन्याचे एक लाख रुपायाचे मानधन पाणी पुरवठा विभागाला दिले.
नगर तालुक्यातील या सरपंचाचा स्तुत्य उपक्रम…
नगर ब्रेकींग न्यूज – सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याने व पाऊस नसल्यामुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे,…
नगर तालुक्यातील कामरगाव येथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून गावाच्या तलावाखालील विहरीतून गावाला पाणीपुरवठा होतो. त्या विहरीचे पाणी कमी झाले आहे, गावाची लोकसंख्या सुमारे ४५०० असून पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून मुळा डॅमची सुपा एमआयडीसी कडे जाणाऱ्या पाईपलाईन मधून गावाकरिता स्वतंत्र पाण्याचे कनेक्शन आहे. पाण्याच्या बिलाची मोठी थकबाकी असल्याने कनेक्शन बंद होते. पाऊस नसल्याने व पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने गावाची तहान भागविण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक या नात्याने तुकाराम कातोरे यांनी त्यांच्या पदभार काळात त्यांना दरमहा मिळणारे तीन हजार मासिक मानधन असे तीस महिन्याचे नव्वद हजार रुपये त्यांना मिळाले होते, त्यात त्यांनी दहा हजार आणखी भर टाकून स्वत:चे एक लाख रुपयांचे धनादेश गावाचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते वसंतराव ठोकळ यांचेकडे सुपूर्द केला, त्यांनी तो धनादेश ग्रामसेवक यांचेकडे दिला, ग्रामपंचायतने त्यात आणखी एक लाख रुपये टाकून असे दोन लाख रुपये मुळा डॅम विभागीय कार्यालय अहमदनगर येथील उपअभियंता गाडेकर यांचेकडे जमा केला. त्यांनी सहायक अभियंता एकनाथ कराळे यांना पाणी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रा.पं.सदस्य संदीप ढवळे, अॅड.प्रशांत साठे, लक्ष्मण शामराव ठोकळ, सैनिक संघटना अध्यक्ष प्रकाश ठोकळ, उपसरपंच संदीप लष्करे, शिवाभाऊ सोनवणे, संतोष साठे यांनी एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला, ऐन दुष्काळी परिस्थितीमध्ये गावात निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई मुळा डॅमच्या पाण्यामुळे दूर होणार असून गावाची तहान भागविली जाणार आहे. यामुळे गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
गावाचे हित लक्षात घेऊन सरपंच कातोरे यांनी स्वत:ला मिळालेले मानधन गावासाठी परत केले व समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला, त्यांचे अनुकरण इतरांना करणे शक्य आहे. नगर तालुक्यामध्ये स्वत:चे मानधन गावासाठी देणारे तुकाराम कातोरे हे पहिले सरपंच ठरले आहेत, या उपक्रमाचे पंचक्रोशीसह तालुक्यातील अनेक मान्यवरांनी कौतुक करीत कातोरे यांचे अभिनंदन केले आहे…
[गावाला वीज व पाणी यांची निरंतर गरज असते, त्यापैकी सरपंच तुकाराम कातोरे यांनी पाण्याला प्राधान्य देऊन गावाप्रती उत्तरदायित्व फेडण्याचे पवित्र व पुण्याचे काम केले, गावकऱ्यांच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद.
वसंतराव ठोकळ, माजी सरपंच तथा ज्येष्ठ नेते कामरगाव…