नगर ब्रेकींग न्यूज
संतांचे चरित्र वाचल्याने माणसाचे चारित्र्य शुद्ध होते – हभप प्रांजल महाराज जाधव..
रुईछत्तिशी येथे जगदंबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलारोहन समारंभ उत्साहात..
देविदास गोरे
“रुईछत्तिशी – संतांचे चरित्र वाचल्याने माणसाचे चारित्र्य शुद्ध होते.आजकाल परमार्थ हा तरुणांच्या खांद्यावर येणे गरजेचे आहे त्याशिवाय संतांचे माहात्म्य पुढे येऊ शकत नाही.आई – वडिलांची मनोभावे सेवा करणे आणि अहंकार बाजूला ठेऊन समाजसेवा करणे हेच धर्माचे लक्षण आहे असे प्रतिपादन हभप प्रांजल महाराज जाधव यांनी केले. रुईछत्तिशी येथे जगदंबा मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलश रोहन समारंभ प्रसंगी किर्तनरुपी सेवेत त्या बोलत होत्या. सत्वर पाव ग मला , भवानी आई रोडगा वाहिन तुला या संत एकनाथ महाराज यांच्या अभंगाचे सुंदर निरूपण त्यांनी केले.गेल्या एक वर्षापासून सुरू असणाऱ्या या मंदिर जीर्णोद्धाराचे काम खूप पारदर्शी झाले आहे.गावातील अनेक दात्यांनी या मंदिराचे काम पूर्ण करण्यासाठी मोठा आर्थिक हातभार लावला आहे.गावात अनेक वर्षापासून मंदिरांचे जीर्णोद्धार काम हाती घेण्यात आले आहे.नवरात्री उत्सवाच्या अगोदर मंदिर पूर्ण झाल्याने देवीभक्तांच्या इच्छा – अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत.गावातील विशेष देणगी देणाऱ्या दात्यांचे श्रीफळ देऊन कौतुक करण्यात आले.प्रांजल दीदी यांनी गावचे विशेष कौतुक करून भविष्यात अनेक धार्मिक कार्यक्रम करण्याचे सूतोवाच केले.कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
गावातील प्रत्येक व्यक्तीने या मंदिर कामासाठी हातभार लावला आहे.प्रत्येकाचे विशेष कौतुक मंदिर समितीकडून करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी भाजपचे युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय कर्डिले , युवा नेते दादासाहेब दरेकर यांनी भेट देऊन रुईकरांचे कौतुक केले.अक्षय कर्डिले यांनी पुढील धार्मिक कार्यक्रम होण्यासाठी ग्रामपंचायत समोर वर्षाच्या आत सभामंडप मंजूर करुन देऊ असे सांगून गावच्या विकासात कोठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली यावेळी गावातील सर्व पदाधिकारी , भजनी मंडळ , ग्रामस्थ , माता – भगिनी , तरुण मंडळे उपस्थित राहून कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले.गावातील विविध धार्मिक सोहळ्याचे होत असलेले जंगी नियोजन पंचक्रोशीतील गावांना आदर्शवत ठरले आहे.भरपूर पाऊस पडू दे , धन – धान्य सृष्टी सुखी राहू दे अशी प्रार्थना प्रांजल दीदी यांनी केल्याने उपस्थित टाळ्यांचा गजर करत हास्याची ललकारी दिली