निंबळक येथे स्पर्धा परीक्षा वाचनालय उभारणारतरुणांसाठी आशेचा नवा प्रकाश; महेश म्हस्के यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

निंबळक येथे स्पर्धा परीक्षा वाचनालय उभारणार
तरुणांसाठी आशेचा नवा प्रकाश; महेश म्हस्के यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

अहिल्यानगर : निंबळक तालुक्यात औद्योगिक वसाहत जवळ असल्याने मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग निंबळक येथे वास्तव्यास आहे. त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांची संख्याही लक्षणीय आहे. या भागामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात असून स्पर्धा परीक्षांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. मात्र नगर शहरात जाऊन अभ्यास करणे, खाजगी क्लासेस लावणे तसेच महागडी पुस्तके खरेदी करणे अनेक विद्यार्थ्यांना परवडणारे नाही.
हीच बाब लक्षात घेऊन निंबळक येथील युवा नेतृत्व महेश म्हस्के यांनी गावातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याच अनुषंगाने लवकरच निंबळक येथे स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तसेच संघ लोकसेवा आयोग (UPSC) सारख्या महत्त्वाच्या परीक्षांचा दर्जेदार अभ्यास करता येणार आहे. अभ्यासासाठी आवश्यक असलेली मूलभूत व संदर्भ पुस्तके, चालू घडामोडींचे साहित्य, मार्गदर्शनपर पुस्तके उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही म्हस्के यांनी सांगितले.
या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना महेश म्हस्के म्हणाले की, “ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थितीमुळे अनेक हुशार विद्यार्थी मागे पडतात. योग्य साधनसामग्री व अभ्यासाची सोय गावातच उपलब्ध झाली तर येथील विद्यार्थी मोठ्या शासकीय सेवेत अधिकारी म्हणून रुजू होतील आणि निंबळक गावाचे नाव लौकिक मिळवेल.”
या संदर्भात त्यांनी ग्रामस्थांचा सल्ला घेतला असता गावकऱ्यांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. या वाचनालयाच्या माध्यमातून निंबळक गाव देशाच्या नकाशावर ओळख निर्माण करेल आणि येथून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अधिकारी पदावर पोहोचतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
महेश म्हस्के यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, अशाच दूरदृष्टी असलेल्या युवा नेतृत्वाची गावाला गरज आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या काही काळातच हे स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू होणार असून, निंबळकच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम नक्कीच दिशादर्शक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *