पारनेर तालुक्यातील कर्जुले हरेश्वर येथे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ संपन्न..*
पारनेर(प्रतिनिधी)
कर्जुले हरेश्वर ता. पारनेर येथील 3.68 कोटी रुपयांचा विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात तसेच जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून त्यांचे जंगी स्वागत केले, याबद्दल सुजय विखेंनी समस्त ग्रामस्थांचे आभार मानले.
कर्जुले येथील आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी विश्वनाथ कोरडे,नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के सर, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, शिवसेना तालुकाध्यक्ष विकास रोहकले, डॉ. भाऊसाहेब खिलारी, सरपंच सौ. संजीवनी आंधळे, मिलिंद शिर्के,पंकज काटखिले, बाबासाहेब खिलारी, दत्ता नाना पवार,गंगाराम रोहकले, शिवाजी रोकडे, मनोज मुंगसे,प्रकाश ढानगे, नितीन आंधळे, लहू भालेकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सुजय विखे यांनी संवाद साधताना स्पष्ट केले की, पारनेर तालुक्यामध्ये खासदार झाल्यानंतर जवळपास साडेचार वर्षे झाले व नगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला, परंतु एवढ्या उन्हातही भव्य स्वागत माझं कधीही झालेले नाही ते आज कर्जुल्याच्या ग्रामस्थांनी केले. जनतेने दिलेल्या या प्रेमाबद्दल त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
मागच्या दीड वर्षांमध्ये राज्यात भाजप महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यासह पारनेर तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच उन्हातान्हात डोक्यावर हंडा घेऊन पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या महिला भगिनिंच्या डोक्यावरील हंडा उतरवून त्यांना नळाने पाणी पुरवठा व्हावा यासाठी देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी योजना राबवून महिलांची होणारी पायपीट थांबविली आहे. केवळ पारनेर तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पाण्याचा प्रश्न मिटविण्याचे श्रेय हे खऱ्या अर्थाने पंतप्रधानांना जाते. त्यामुळे कामाचे श्रेय घेणाऱ्यांनी घ्यावे, परंतु आमचे नेते नरेंद्र मोदी आहेत असे जनतेला सांगावे, किमान विकासकामांचे श्रेय घेताना ज्यांनी सदर योजना सुरू केल्या आहेत, त्यांचा फोटो तरी लावावा कारण गोरगरीबाला पिण्याचे पाणी देण्याचे काम हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात होत आहे याची जाणीव त्यांनी ठेवावी असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले.
तसेच कोण कोणाच्या पाठीशी आणि कोण कोणाच्या गाडीत बसलाय याचा थांगपत्ता देखील कुणाला आजकाल लागत नाही असा चिमटा काढत आजच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले. तसेच महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारकीर्दीत नगर जिल्ह्यात झालेला बदल विषद करून लम्पी सारख्या भयंकर आजारावर त्यांच्या नेतृत्वात कशी मात करण्यात आली आणि प्रत्येकाच्या गोठ्यात शासकीय डॉक्टरांनी लसीकरण करत यातून पशुधनाला वाचवले, तसेच तालुक्यामध्ये जेवढे जनावर दगावले त्यांना तीस हजार रुपयांची मदत, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या गाईंचा विमा उतरवण्याच्या निर्णयाचे देखील कौतुक त्यांनी यावेळी केले.
दरम्यान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारमार्फत अनेकविध योजना या जिल्ह्यात व पारनेर तालुक्यात राबविण्यात येत आहेत. त्या योजनांचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला असून इथून पुढे देखील अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनांचा लाभ कसा पोहोचेल यासाठी कटिबध्द असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 26 तारखेच्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्याबद्दल देखील त्यांनी भाष्य केले आणि शिर्डी येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नागरिकांना केले.