दक्षिणेला साखर वाटणारा नव्हे तर युवक, महिलांना रोजगार, पायाभूत सुविधा देणारा खासदार हवा – किरण काळे ;

 दक्षिणेला साखर वाटणारा नव्हे तर युवक, महिलांना रोजगार, पायाभूत सुविधा देणारा खासदार हवा – किरण काळे ;

साखर वाटप घोटाळ्याची चौकशी व्हावी
खासदार, शहर भाजप नगरकरांची परस्परविरोधी वक्तव्यातून दिशाभूल करत आहेत
भाजपचा भ्रष्टाचारी बुरखा शहर काँग्रेस फाडणार
————————————————-
प्रतिनिधी : नगर शहरासह दक्षिणेत मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. विकासाचे व्हिजन नसणाऱ्या नेतृत्वामुळे शहरात बाजारपेठ, एमआयडीसीची वाताहत झाली आहे. शहरात गुंडगिरी, दहशत करणाऱ्या लोकप्रतिनिधींना खासदार, पालकमंत्र्यांच पाठबळ आहे. तर ग्रामीण भागात शेतकऱ्याला विष घेणे सुद्धा परवडणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यातच युवक, महिलांना रोजगार वाटण्या ऐवजी साखर वाटणारा डॉक्टर खासदार मिळाला आहे. ही साखर कोणत्या निधीतून वाटली जात आहे ? निवडणुक आल्यावरच का वाटली जात आहे ? पाच वर्षे का वाटली नाही ? साखर वाटणे हे खासदाराचे काम असेल तर रोजगार, पायाभूत सुविधा कोण वाटणार ? असे अनेक सवाल विचारत खा. सुजय विखे पाटील यांच्या दक्षिणेतील साखर वाटप कार्यक्रमा वरून काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव मधील साखरेसाठी दिवसभर उन्हा तान्हात रांगेत उभे राहिलेल्या महिला, ग्रामस्थांचा संतप्त व्हिडिओ सोशल मेडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावरही काळेंनी संताप व्यक्त केला असून, निवडणूक आयोगाने या साखर वाटप घोटाळ्याची दखल घेतली पाहिजे. हजारो टन साखर वाटप घोटाळा प्रकरणाची सखोल चौकशी झाली, तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील असे म्हटले आहे. ते म्हणाले, देव दर्शन, साखर वाटप मोहिमेनंतर दक्षिणेतील माता-भगिनींना साडी वाटप मोहीम देखील खासदार सुरू करणार असल्याची चर्चा आहे. देशात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या धाडी फक्त विरोधकांवरच पडतात. भाजपचे लोकप्रतिनिधी मात्र सत्तेचा गैरवापर करून आगामी निवडणुका विकासाच्या नव्हे तर प्रलोभनांच्या बळावर जिंकण्याची रणनीती आखत आहेत. शासकीय अनुदानावर चालणाऱ्या आपल्या खाजगी शिक्षण संस्थेचा स्टाफ खासदार दक्षिणेमध्ये प्रचार यंत्रणा म्हणून वापरत आहेत. डॉक्टरेट असणारे प्राध्यापक शैक्षणिक काम सोडून कार्यकर्त्यांच्या दारोदारी पाठविले जात असल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे.  
काळे म्हणाले, खासदार म्हणतात विरोधकांच्या डोक्यांचं सिटी स्कॅन करतो. विरोधकांचे नव्हे तर तथाकथित न्यूरो सर्जन असणाऱ्या डॉक्टर खासदारांच्याच मेंदूचं स्कॅनिंग करण्याची गरज आहे. उत्तरेतून दक्षिणेकडे येणाऱ्या त्यांच्या घरचा नगर मनमाड रस्ता सुद्धा ते करू शकले नाहीत. नगर शहरात कोट्यवधी रुपयांचा निधी आमदार, खासदार यांच्या जोडीने आणल्याच्या वल्गना ते करतात. मग शहर खड्ड्यात का आहे ? दक्षिणेतील अनेक गावांचे, तालुक्यांचे नगर शहराशी जोडले जाणारे रस्ते खराब आहेत. पाच वर्षात त्यांना ते करता आले नाहीत. यांना खासदारकी, पालकमंत्री, महसूल मंत्री अशी सगळीच महत्त्वाची पद जनतेने दिली. मात्र यांनी फुकट साखर वाटून जनतेचा स्वाभिमान विकत घेण्याचा किळसपणा प्रयत्न चालविला आहे. जसे शंभर बोकडं कापून कोणी पुन्हा खासदार होत नसतं. तसंच नागरिकांना पाच किलो साखर वाटून देखील कुणी खासदार होत नसतं हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा जोरदार टोला काळे यांनी विखे पाटील यांना लगावला आहे. 
सावेडीत एका कार्यक्रमात बोलताना खासदार म्हणाले की नगर मनपाचा कारभार सुधारत आहे. तर शहर भाजपने म्हटले की महापालिकेत रोज नवीन घोटाळे समोर येत आहेत. भाजप खासदार आणि शहर भाजप यांच्या परस्पर विरोधी वक्तव्यांचा खरपूस समाचार घेताना काळे म्हणाले, भाजप हा नौटंकीबाज पक्ष आहे. खोटं बोलणं हा भाजपचा डीएनए आहे. अशा वक्तव्यातून जनतेची दिशाभूल केली जात आहे. राज्यात भाजप, राष्ट्रवादीची युती आहे. शहर भाजप हे विसरली आहे की यांचे खासदार ज्या राष्ट्रवादीवर ते टीका करतात त्या राष्ट्रवादीच्या आमदारांना विचारल्याशिवाय शहरात फिरू शकत नाहीत. त्यांची तथाकथित सहमती एक्सप्रेस आहे. शहर भाजपने हेही विसरू नये की अडीच वर्षांपूर्वी तुम्हीच राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने मनपात सत्तेत होतात. खरंतर या अडीच वर्षांमध्ये जेवढा भ्रष्टाचार आणि घोटाळे मनपात झाले तेवढे यापूर्वी कधीच झालेले नाहीत. शहर काँग्रेस आगामी काळात भाजप – राष्ट्रवादी अभद्र युतीच्या भ्रष्टाचाराचा बुरखा फाडल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा किरण काळेंनी दिला आहे. 
विज, पाणी मोफत वाटा :
खासदारांनी नुसती साखर मोफत वाटण्या ऐवजी नगर शहरासह दक्षिणेतील नागरिक, शेतकऱ्यांना किमान पाच वर्षांसाठी शंभर टक्के मोफत वीज वाटावी. शहर मनपा नागरिकांकडून वर्षाकाठी ५० ते १५० दिवसच पाणी देते. ते ही अस्वच्छ आणि अपूरे असते. मात्र पाणीपट्टी ३६५ दिवसांची घेते. तेव्हा नगरकरांना शंभर टक्के पाणी मोफत वाटावे. पाच किलोत पाच वर्षे कुणाचे कुटुंब चालू शकत नाही. त्यांना जर वाटायचं असेल तर त्यांनी नगर दक्षिणेतील प्रत्येक कुटुंबांना पाच वर्षांसाठी प्रत्येक महिन्याचा संपूर्ण किराणा, भाजीपाला, दूध, गॅस, पेट्रोल मोफत वाटावे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, संपूर्ण कुटुंबाचा आरोग्याचा खर्च मोफत करावा. व्यवसायाच्या संधी अभावी कर्जात बुडालेल्या व्यापारी, उद्योजकांची कर्ज भरून त्यांना आणि शेतकऱ्यांना देखील कर्जमुक्त करावे. व्यापाऱ्यां कडून व्यावसायिक परवाना शुल्क वसुलीचा निर्णय रद्द करावा. कामगारांचे कोट्यावधी रुपयांचे थकीत वेतन देऊन टाकावे. शहरातली गुंडगिरी, तांबेमारी बंद करावी. वाळू तस्करांच्या मुसक्या आवळून दाखवाव्यात. विखे पाटलांनी हे करून दाखवल्यास खासदारांना पुन्हा लोकसभेवर बिनविरोध पाठवा यासाठी मी स्वतः पुढाकार घेईल, असा उपरोधिक टोला किरण काळे यांनी सुजय विखेंना लगावला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *