केडगावच्या रखडलेल्या विकासकामांना गती देण्यात यश : महापौर रोहिणी शेंडगे
अंबिकानगर ते शाहूनगर रस्त्याचे रखडलेले काम मार्गी, कॉंक्रीटिकरण कामाचा शुभारंभ
नगर : महानगरपालिकेतील सत्तेच्या माध्यमातून शिवेसेने नगर शहराच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. मागील अडीच वर्षात शहरासह सावेडी, केडगाव उपनगरात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लावली आहेत. केडगावमधील रखडलेल्या विकासकामांना आमच्या सत्तेच्या काळात गती मिळाली आहे. अंबिकानगर ते शाहूनगर रस्त्याचे काम काही कारणांनी रखडलेले होते, ते सुध्दा आता मार्गी लावून नागरिकांची मोठी गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. दर्जेदार रस्ते करताना आधी रस्त्याखालील गटारी, ड्रेनेजची कामे पूर्ण केली आहेत. तसेच प्रभाग सुशोभिकरणावर भर, पथदिव्यांची व्यवस्था करणे अशा कामांतून मोठा विकास साधण्यात आला आहे, असे प्रतिपादन महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी केले.
केडगावमधील प्रभाग क्रमांक 16 अंबिकानगर ते शाहूनगर या सर्वात मोठ्या वर्दळीच्या रस्त्याचे रखडलेलेे कॉंक्कारीटिकरणाचे काम शिवसेना नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहे. या कामाचा शुभारंभ महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते झाला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेविका सुनिता संजय कोतकर, नगरसेवक विजय पठारे, नगरसेविका शांताबाई शिंदे, नगरसेवक अमोल येवले, नगरसेवक दत्ता कावरे, नगरसेवक सचिन शिंदे, संग्राम कोतकर,गौरव कार्ले ,प्रेम कोहक,बबलू शिंदे, यशोदा गावंडे, हेमराज पाटील, रासकर मॅडम, सुनंदा निवाण, सविता जाधव, आदी उपस्थित होते.
संभाजी कदम म्हणाले, महापालिकेत प्रशासक राज सुरु झाला तरी शिवसेनेचे नगरसेवक केडगावमधील प्रभागांत विकासकामांसाठी कायम आग्रही राहणार आहेत. आताही अंबिका नगर ते शाहूनगर रस्त्याचे प्रलंबित काम मार्गी लावून शिवसेनेने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आगामी निवडणुकीत केडगावकर पुन्हा एकदा शिवसेनेलाच साथ देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगरसेवक अमोल येवले म्हणाले, एक वर्षभरापासून या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा चालू होता. अर्धवट खोदलेल्या रस्त्याचा परिसरातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. याला अनेक गोष्टी कारणीभूत असल्या तरी शेवटी रस्त्याचे काम सुरु करण्यात यश आले आहे. नागरिकांचे समाधान हेच आमच्यासाठी मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक रहिवाशांनीही या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरु झाल्याने समाधान व्यक्त केले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.