विखेंच्या धनशक्तीसमोर लंकेंची जनशक्ती भारी !
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा विश्वास
जामखेड येथे लंके यांच्या प्रचारार्थ सभा
जामखेड : प्रतिनिधी
नगर लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या धनशक्तीसमोर महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांची जनशक्ती भारी पडणार असून लंके हे खासदार म्हणून संसदेत जाणार असल्याचा विश्वास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ जामखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये आ. जाधव हे बोलत होते.
यावेळी बोलताना जाधव म्हणाले, नीलेश लंके यांचा विजय लोकशाही व संविधानाचा विजय असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विकासाचा मुद्दा नाही. म्हणून ते भावनिक मुद्दे पुढे करत आहेत. मोदी यांनी मागील दोन्ही निवडणूकांमध्ये जनतेला मोठी अश्वासने दिली होती. या आश्वासनांच्या स्वप्नात जनता होती. मात्र गेल्या दहा वर्षात जनतेच्या सर्व स्वप्नांचा चुराडा करीत देशाला महागाई, बेरोजगारीच्या खाईत लोटले असल्याचा हल्लाबोल जाधव यांनी केला.
जाधव म्हणाले, पुलवामा हल्ल्यात आपले ४२ जवान नाहक मारले गेले. देशावर शोककळा असतना पंतप्रधान चित्रीकरणात व्यस्त होते. आपणास भावनिक राजकारण करून त्यांनी देशाला दोनदा गंडविले आहे. आपले पक्ष फोडणारांना जनता कदापी माफ करणार नाही. मोदी सरकार चारसो पार नाही तर तडीपार होणार असल्याचा घणाघातही जाधव यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, भाजपाने पवार कुटूंबियांना इडीच्या माध्यमातून त्रास दिला. त्यांनी आपल्यासोबत यावे म्हणून दबाव आणला गेला. परंतू रोहित पवार हे घाबरले नाहीत. त्यांनी या सर्व त्रासाचा सामना केला. जीएसटीच्या रूपाने भाजपाने सर्वसामान्य जनता, शेतकरी वर्गाचा खिसा कापला आहे. सगळयाच वस्तूंवर जीएसटी आकारण्यात येत असून भाजपाच्या काळात देश आराजकतेकडे चालला आहे. एकीकडे २५ लाख कोटी रूपयांचे उद्योगपतींचे कर्ज माफ केले जात असताना दुसरीकडे सर्वसामान्य जनतचे हाल होत असल्याची टीका पाटील यांनी केली.
▪️फोटो ओळ