मी उपलब्ध करुन दिलेल्या निधीवरच निलेश लंके विकासाच्या गप्पा मारत आहेत.
मागील विधानसभेला उमेदवारी दिली हीच मोठी चुक झाली,
माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करु नका, तुम्ही ज्या शाळेत शिकले त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निलेश लंकेना टोला
नगर, दि. १० प्रतिनिधी
मी उपलब्ध करुन दिलेल्या निधीवरच निलेश लंके विकासाच्या गप्पा मारत आहेत. कोणताही अनुभव नसताना खासदार होण्यासाठी निघालेल्यांनी आधी कामाचा अनुभव घ्यावा असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजीत पवार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिला.
पारनेर येथे महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ना.अजीत पवार बोलत होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
भरपाऊसामध्ये झालेल्या या सभेत अजीत पवार यांनी निलेश लंके यांचा आपल्या शैलीने चांगलाच समाचार घेतला. मागील विधानसभेला उमेदवारी दिली हीच मोठी चुक झाली, परंतू त्यांच्या उमेदवारीचा ज्यांनी आग्रह धरला तेच आता मला खासगीत येवून भेटत आहेत असे स्पष्ट सांगून मी निधी उपलब्ध करुन दिल्यामुळेच पारनेर तालुक्याच्या विकास कामांना गती मिळाली. साडेचार वर्षात तुम्ही काय दिवे लावले चांगले माहीत आहे. कोणताही कामाचा अनुभव नाही तरीही खासदार व्हायचे स्वप्न काहीजण पाहत असल्याची टिका त्यांनी आपल्या भाषणात केली.
तालुक्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांना दमबाजी करण्यात येत असल्याचा उल्लेख करुन, पवार म्हणाले की, त्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे मला चांगले माहीत आहे. माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करु नका, तुम्ही ज्या शाळेत शिकले त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा समाचार घेवून पारनेरकरांनी आता आमदार नाही म्हणून चिंता करु नये. संपूर्ण महायुतीचे सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. निधीची कमतरता तुम्हाला भासणार नाही.
तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत आचार संहिता संपल्यानंतर तातडीने बैठक घेण्याची ग्वाही देवून पवार यांनी सांगितले की, खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात निधीची उपलब्धता करुन, विकास कामे मार्गी लावली आहेत. भविष्यातही केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणायचा असेल तर, त्यांच्या सारखा खासदार निवडून जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ही निवडणूक तालुक्यातील दहशत आणि गुंडगिरीच्या विरोधात आहे. या तालुक्यातील युवकांना आता रोजगार निर्माण करुन देण्यासाठी आराखडा तयार केला असून, या पुढे आता एकही उद्योग कुणाच्या दादागिरीमुळे जिल्ह्यातून निघुन जाणार नाही असे आश्वासित करुन, महायुतीच्या पाठीशी मतदार संघातील सर्व जनतेने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी तालुक्यात यापुर्वी महिला आधिका-यांना झालेल्या त्रासाची आवठण ठेवा, आपल्याला सुसंस्कृत आणि सुशिक्षीत खासदार निवडून पाठवायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून या भागाचा विकास होवू शकले. यासाठी डॉ.सुजय विखे पाटील यांना साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.