केडगाव औद्योगिक वसाहत प्रभाग क्रमांक १५ मधील रखडलेली विकासकामे मार्गी लावणार – दत्ता गाडळकर
केडगाव औद्योगिक वसाहत अंतर्गत प्रभाग क्रमांक १५ मध्ये अलीकडेच नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या भागासह जुन्या व नव्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे रखडलेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. या संपूर्ण परिसरातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असून, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
प्रभागातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धूळ यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी वाहनचालकांनाही अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
याशिवाय प्रभागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक भागांत अद्याप नियमित नळ पाणीपुरवठा सुरू नसून, नागरिकांना टॅंकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंडासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांच्या समस्या ऐकून घेताना दत्ता गाडळकर यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे. “जुन्या तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व इतर मूलभूत सुविधांचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला जाईल. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले.
प्रभागातील रखडलेल्या विकासकामांचा सखोल आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने कामे पूर्ण केली जातील. अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना, तसेच नागरी सुविधांचे सशक्त जाळे उभारण्यावर भर दिला जाईल, असा विश्वासही दत्ता गाडळकर यांनी व्यक्त केला आहे.
नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे गांभीर्याने पाहणारे नेतृत्व मिळावे, अशी अपेक्षा प्रभागातील नागरिक व्यक्त करत असून, येणाऱ्या काळात या आश्वासनांची अंमलबजावणी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केडगाव औद्योगिक वसाहत प्रभाग क्रमांक १५ मधील रखडलेली विकासकामे मार्गी लावणार – दत्ता गाडळकर


