केडगावमध्ये भानुदास कोतकर झाले निवडणूक प्रचारात सक्रिय
अपक्षांच्या स्वाभिमानी केडगावकर आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार सुरु
नगर – महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत केडगाव मध्ये ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर हे पुन्हा एकदा प्रचाराच्या मैदानात सक्रिय झाले आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून काही कारणांमुळे प्रचारापासून अलिप्त असलेले कोतकर अचानक सक्रिय झाल्याने केडगावच्या राजकीय समीकरणांत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भानुदास कोतकर हे केडगावच्या राजकारणातील एक केंद्रबिंदू मानले जातात. ते पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच कोतकर समर्थकांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे. कोतकर यांनी थेट शाहूनगर परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या री एन्ट्रीमुळे सुस्तावलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य संचारले आहे.
भानुदास कोतकर यांनी निवडणुकीपूर्वी भाजपाच्या नेत्यांशी संपर्क केला होता. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाशी त्यांचे बोलणे झाले होते. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी कोणत्याही पक्षाकडून आपल्या समर्थकांसाठी उमेदवारी न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी प्रभाग क्रमांक १६ आणि १७ मध्ये आपले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. चिन्ह वाटप होताच या उमेदवारांनी स्वाभिमानी केडगावकर आघाडीची घोषणा करत प्रचार सुरु केला. मात्र ३-४ दिवस कोतकर हे प्रचारात सक्रीय झालेले नव्हते. मात्र ते आता पुन्हा प्रचारात सक्रीय झाले आहेत. कोतकर स्वतः मैदानात उतरून स्वाभिमानी केडगावकर आघाडीच्या उमेदवारांसाठी व्यूहरचना आखत आहेत. कोतकरांचा दांडगा अनुभव आणि जुना जनसंपर्क पाहता, आगामी काही दिवसांत केडगावच्या राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात.
एकीकडे महायुती, दुसरीकडे महाविकास आघाडी आणि तिसरीकडे कोतकरांचे समर्थक असा त्रिकोणी संघर्ष प्रभाग १६ आणि १७ मध्ये अधिक तीव्र झाला आहे. भानुदास कोतकर यांच्या सक्रियतेने मतदानाची टक्केवारी आणि मतदारांचा कौल कोणाकडे झुकणार, याकडे संपूर्ण शहराचे आणि जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
केडगावमध्ये भानुदास कोतकर झाले निवडणूक प्रचारात सक्रियअपक्षांच्या स्वाभिमानी केडगावकर आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार सुरु


