“साक्षात देवाने सत्कार केल्याची अनुभूती”; हिवरे बाजार भेटीत भाऊ कदम भावूक
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत अभिनेता भाऊ कदम यांची हिवरे बाजारला भेट; ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत
हिवरे बाजार (अहिल्यानगर): “आपल्या भारतीय संस्कृतीने पाणी, वन, स्वच्छता आणि व्यसनमुक्तीमध्ये देवत्वाचे अधिष्ठान मानले आहे. हिवरे बाजारने नेमके हेच कार्य करून दाखवले आहे. त्यामुळे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना साक्षात देवच माझा सत्कार करत असल्याची जाणीव मला झाली,” असे भावोद्गार प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते भाऊ कदम यांनी काढले.
आज बुधवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत हिवरे बाजार (ता. जि. अहिल्यानगर) येथील विकासकामांची पाहणी व मार्गदर्शनासाठी भाऊ कदम यांनी भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
श्रमदान हाच विकासाचा आत्मा
यावेळी हिवरे बाजारचे शिल्पकार पद्मश्री पोपटराव पवार यांनी गावातील जलसंधारण, स्वच्छता आणि आदर्श ग्रामरचनेची सविस्तर माहिती दिली. भाऊ कदम यांनी गावातील कामांचे कौतुक करताना सांगितले की, “कोणतेही मोठे यश मिळाले की आपण त्याला देवाची कृपा मानतो. हिवरे बाजारमध्ये लोकवर्गणी आणि श्रमदानाच्या माध्यमातून जे परिवर्तन झाले आहे, तो या विकासाचा आत्मा आहे. अमीर खान यांच्या ‘पाणी फाउंडेशन’च्या निमित्ताने मला पोपटराव पवारांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती, मात्र आज प्रत्यक्ष या भूमीत येणे हे माझे परमभाग्य समजतो.”
मातृभूमीच्या विकासाचा संकल्प
हिवरे बाजारच्या विकासप्रक्रियेने प्रभावित होऊन भाऊ कदम यांनी एक महत्त्वाचा संकल्प यावेळी जाहीर केला. हिवरे बाजारच्या धर्तीवर आपल्या जन्मगावाचा विकास करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असून, तेथील ग्रामस्थांना विकासकामांसाठी आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘स्मृती उद्यानात’ वृक्षारोपण आणि हास्याची कारंजी
भेटीचे औचित्य साधून भाऊ कदम यांनी सोबत आणलेल्या आंब्याच्या रोपाचे हिवरे बाजार येथील ‘स्मृती उद्यानात’ वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोपटराव पवार यांनी मिश्किल टिप्पणी करत, “या झाडाचे आंबे खाण्यासाठी तुम्हाला पुन्हा हिवरे बाजारला यावे लागेल,” असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी हिवरे बाजार ग्रामस्थांच्या वतीने भाऊ कदम यांना मानपत्र, फेटा आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) दादाभाऊ गुंजाळ, राजेंद्र देसले (स्वच्छता व पाणीपुरवठा), दुगम (सहा. गटविकास अधिकारी), विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे, व्हा. चेअरमन रामभाऊ चत्तर, सहदेव पवार यांसह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साक्षात देवाने सत्कार केल्याची अनुभूती”; हिवरे बाजार भेटीत भाऊ कदम भावूक


