शेतीसाठी मुळा धरणाचे पाणी दरेवाडी गटातील गावांना मिळवून देणार – उद्धव कांबळे
दरेवाडी जिल्हा परिषद गटातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याअभावी अडचणीत सापडले आहेत. पावसावर अवलंबून असलेली शेती, कोरडवाहू भागातील वाढती दुष्काळी परिस्थिती आणि अपुरी सिंचन व्यवस्था यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मुळा धरणाचे पाणी दरेवाडी गटातील गावांना मिळवून देण्यासाठी ठोस व निर्णायक लढा उभारणार असल्याचा निर्धार कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक उद्धव कांबळे यांनी व्यक्त केला आहे.
उद्धव कांबळे म्हणाले की, मुळा धरण परिसरात असूनही दरेवाडी गटातील अनेक गावांना आजतागायत सिंचनाचा लाभ मिळालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना शेती सोडून स्थलांतर करावे लागत आहे. ही अन्यायकारक परिस्थिती आता खपवून घेतली जाणार नाही. शासनाच्या सिंचन धोरणानुसार दरेवाडी गटातील सर्व पात्र गावांना मुळा धरणाचे पाणी मिळावे यासाठी संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केला जाईल.
ते पुढे म्हणाले की, पाणी मिळाल्यास शेतीचा चेहरामोहरा बदलेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, दुबार पीक शक्य होईल आणि तरुण पिढी शेतीकडे वळेल. दरेवाडी गटाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शेती, पाणी, रस्ते, वीज आणि शिक्षण या सर्व मुद्द्यांवर ठोस काम करण्याची गरज आहे. केवळ आश्वासनांवर नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून विकास साधला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरेवाडी गटातील शेतकरी व ग्रामस्थांनी उद्धव कांबळे यांच्या या भूमिकेचे स्वागत केले असून, “पाणी मिळाले तरच शेती वाचेल” अशी भावना व्यक्त केली आहे. मुळा धरणाचे पाणी दरेवाडी गटाला मिळवून देण्याचा हा प्रश्न आता राजकीय पातळीवर ठामपणे मांडला जाणार असून, यासाठी एकसंघ लढा उभारला जाईल, असेही उद्धव कांबळे यांनी स्पष्ट केले.
शेतीसाठी मुळा धरणाचे पाणी दरेवाडी गटातील गावांना मिळवून देणार – उद्धव कांबळे


