रस्त्यावरच पोलांचे साम्राज्य!सोलर प्रकल्पाच्या बेफिकीर कामामुळे ग्रामीण जीवन विस्कळीत; ग्रामस्थांचा संताप उसळला

.रस्त्यावरच पोलांचे साम्राज्य!
सोलर प्रकल्पाच्या बेफिकीर कामामुळे ग्रामीण जीवन विस्कळीत; ग्रामस्थांचा संताप उसळला

बाळासाहेब गदादे

चिचोंडी पाटील:
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सोलर कंपनीने प्रकल्पातील लाईनसाठी ग्रामीण रस्त्यालगतच पोल उभारण्याचा गोंधळ उडवणारा पद्धतशीर उपद्व्याप सुरू केले असून, शेतकरी आणि ग्रामस्थ या कामावर संतप्त आहेत. ग्रामीण भागातील साधे, सोयीचे आणि दैनंदिन वाहतुकीसाठी आवश्यक रस्ते हे आता लोखंडी पोलांनी व्यापले असून, जनावरांची ने-आण, ट्रॅक्टरची वाहतूक, पीक काढणी, औजारे वाहतूक — अशा सर्व व्यवहारात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. ग्रामस्थ या परिस्थितीवर संताप व्यक्त करत म्हणत आहेत की, “हा रस्ता आहे की सोलर प्रकल्पाचा प्लॉट? गावाच्या जीवनवाहिनीवरच हा प्रकल्प कब्जा करत आहे.”

या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे सोलर कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाची (PWD) अधिकृत परवानगी घेतली आहे की नाही. या संदर्भात प्रशासनाकडून कोणताही स्पष्ट खुलासा करण्यात आलेला नसल्याने ग्रामस्थांचा संशय अधिकच गडद होत आहे. गावकऱ्यांचे मत आहे की हा प्रकार तपासाचा व जबाबदारी निश्चितीचा विषय आहे आणि यामागे काही मोठे दुर्लक्ष किंवा स्वार्थसिद्धीचा हेतू दडलेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोलर प्रकल्पाच्या पोल उभारणीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी पोलचे फाउंडेशन अतिशय निकृष्ट दर्जाचे आढळत आहे. यामुळे पुढील दिवसांत पावसाळा, वादळे व जोरदार वाऱ्याच्या काळात हे पोल कोसळून गंभीर अपघात घडू शकतात, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. कंपनीकडून सुरक्षेच्या कोणत्याही निकषांचे पालन होत नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

प्रकल्पापासून सबस्टेशनपर्यंत लाईन ओढण्यासाठी शासनाने नेमलेला अधिकृत मार्ग कोणता आहे, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. मंजूर मार्ग एक असताना प्रत्यक्षात वापरला जाणारा मार्ग वेगळाच असल्याचा संशय ग्रामस्थांमध्ये तीव्र होत आहे. कंपनीकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही, ज्यामुळे संपूर्ण कामावर अधिकच रहस्य निर्माण झाले आहे.

याशिवाय, रस्त्यालगत उभारले गेलेले पोल भविष्यातील रस्ते रुंदीकरणाच्या सर्व योजना पूर्णपणे अडथळ्यात आणत आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण आता जवळजवळ अशक्य होईल, कारण पोल हटवणे कठीण, वेळखाऊ व खर्चिक आहे. या परिस्थितीमुळे ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेलाच हे पोल अडथळा बनत असल्याची भावना जनतेत पसरली आहे.

या सर्व घटनांमुळे चिचोंडी पाटील व परिसरात ग्रामस्थांचा संताप उफाळला असून ते प्रशासनाला स्पष्ट मागणी करत आहेत की चुकीच्या ठिकाणी उभारलेले सर्व पोल तातडीने हटवावेत.तसेच निकृष्ट दर्जाच्या फाउंडेशनची तपासणी करून जबाबदारी निश्चित करावी

चौकट
सौर प्रकल्प आवश्यक पण विकास थांबु नका

ग्रामस्थांचे म्हणणे स्पष्ट आहे “सौर प्रकल्प आवश्यक असेल, पण ग्रामीण विकास थांबवून, रस्ते बंद करून, शेतकऱ्यांचे जीवन कठीण करून नव्हे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *