सबस्टेशनला कनेक्शन नाही; तरीही मीटर बसले!
सांडवे सौर प्रकल्पात अनियमिततेचा वास; शेतकऱ्यांचा रोष उफाळला
बाळासाहेब गदादे
चिचोंडी पाटील :
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपकेंद्राच्या हद्दीत सांडवे गावातून सुरु असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या लाईन जोडणीच्या कामावर गंभीर शंका आणि अनियमिततेची काळी छाया पसरत आहे. अजून कोणत्याही प्रकारची वीज जोडणी न झालेली असतानाच ‘इन व आउट गोईंग’ मीटर सबस्टेशनमध्ये बसवण्यात आल्याने गावकऱ्यांच्या मनात संशयाची धग पेट घेत आहे.
उपकेंद्राशी कोणताही प्रत्यक्ष कनेक्शन नसताना मीटर बसवण्याची इतकी घाई कशासाठी? मीटर कोणत्या ऊर्जेचे मोजमाप करणार? ही कारवाई तांत्रिकदृष्ट्या अशक्य असतांनाच केली गेल्याने प्रकल्पात काहीतरी ‘गोलमाल’ किंवा कागदोपत्री दाखवण्यासाठीची बनावट कार्यवाही सुरू असल्याची शंका ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
तसेच या प्रकल्पाचे आणखी एक गंभीर रूप म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीवर त्यांची परवानगी न घेता पोल रोवणे. काही जमिनमालकांनी या कामाला तोंडी विरोध दर्शवला; तरीदेखील त्यांच्या हरकतीकडे दुर्लक्ष करून प्रकल्प व्यवस्थापनाने जबरदस्तीने पोल उभारण्यात आले आहेत.
तर काही शेतकऱ्यांनी या प्रकाराबाबत लेखी तक्रार हि केली परंतु तक्रारीनंतरही कोणताही अधिकारी शेतात पाहणीस आला नाही, अशी शेत मालकाची तक्रार आहे. शेतकऱ्यांची शेती ही त्यांची उपजीविका असताना, त्याच जमिनीत असा हस्तक्षेप करून प्रशासनाने त्यांच्या हक्कांनाच तिलांजली दिल्याचे चित्र दिसून येत आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या प्रकल्पामध्ये जे घडत आहे ते “आधी मीटर, मग कनेक्शन” या उलट्या व्यवहाराचे उदाहरण आहे. सामान्यपणे अशा प्रकल्पात पहिल्यांदा तांत्रिक पडताळणी करून जोडणी दिली जाते आणि शेवटी मीटर बसवला जातो. मात्र येथे सर्वच प्रक्रिया उलटपक्षी होत आहे.
या अनियमिततेमुळे गावात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु असून लोकांच्या तोंडी एकच सवाल
“लाईट नाही… पण मीटर कसा? परवानगी नाही… पण पोल कसे?”
याची उत्तरे सध्या कुणाकडेच नाहीत.
सांडवे गावातील सौर ऊर्जा प्रकल्पामुळे विकासाचा मार्ग सुकर व्हायला हवा होता; परंतु अनियमितता, पारदर्शकतेचा अभाव आणि शेतकऱ्यांच्या परवानगीची पायमल्ली यामुळे ग्रामस्थांमध्ये अविश्वासाची जखम खोल होत चालली आहे.
चौकट
वरिष्ठ अधिकाऱ्यान कडून चौकशी व्हावी
उपकेंद्रातील मीटर बसवण्याची प्रक्रिया, पोल उभारणीसंदर्भातील नोंदी व परवानग्या, तसेच प्रकल्पातील कामकाजाची पारदर्शकता याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
चौकट
शासनाच्या सबसिडीसाठीचा ‘घटाटोप’?
ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे की
शासनाची सौर ऊर्जा सबसिडी मिळवण्यासाठी कागदोपत्री कामे दाखवण्याचा हा संपूर्ण प्रकार तर नाही ना ? मीटर आधी बसवणे, कनेक्शन नसणे, परवानगीशिवाय पोल उभारणे, हे सर्व प्रश्न अधिक गंभीर दिशा दाखवत आहेत.


