*चौंडी मध्ये कृषीकन्यांकडून पाच टक्के नीमबीज अर्क तयार करणे व त्याचा वापर करण्याबाबतचे प्रात्यक्षिक
जामखेड: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय, हाळगाव येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनी “ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम- 2025-26” चौंडी येथे राबवीत आहेत. महाविद्यालयातील कृषी कीटकशास्त्र विभागामार्फत विद्यार्थ्यांनी ‘५ टक्के निंबोळी बीज अर्क (NSKE) तयार करणे व त्याची पिकावर फवारणी करणे ‘प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या सादर केले.
या प्रात्यक्षिकामध्ये विद्यार्थ्यांनी निंबोळी बीज अर्क तयार करण्याची पद्धत, त्यासाठी लागणारे साहित्य, प्रक्रिया तसेच शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचे महत्व याची सविस्तर माहिती दिली. कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांऐवजी जैविक पर्याय म्हणून NSKE चा वापर कसा परिणामकारक ठरतो हेही त्यांनी दाखवून दिले.
शेतकऱ्यांना रासायनिक कीटकनाशकांच्या दुष्परिणामांची माहिती तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून उत्पादन खर्च कमी करण्याचे महत्व तसेच पर्यावरणपूरक शेतीसाठी निंबोळी बीज अर्काचा वापर हा सुरक्षित व शाश्वत उपाय असल्याचे कृषी कन्या कु.कदम प्राजक्ता कु. श्रुती काळे कु. वैष्णवी खाडे कु. साक्षी खंडारे कु. मीनल कुवर यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. गोकुळ वामन, केंद्रप्रमुख व मृदा शास्त्र विषय तज्ञ डॉ. प्रेरणा भोसले, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. संदीप मोरे, कार्यक्रम अधिकारी व कृषि अर्थशास्त्र विषय तज्ञ डॉ. उत्कर्षा गवारे यांचे मार्गदर्शन यासाठी लाभले.


