चौंडी मध्ये कृषी कन्यांचे मातीचे नमुने व माती परीक्षण या विषयावर प्रात्यक्षिक
जामखेड: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय, हाळगाव येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनी “ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम- 2025-26” चौंडी येथे राबवीत आहेत. चौंडी गावामध्ये कृषि कन्या या शेतीशी निगडित विविध प्रात्यक्षिके घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून कृषिकन्यांनी मातीचे नमुने घेणे व माती परीक्षण या विषयावर गावामध्ये प्रात्यक्षिक घेतले. त्यांनी शेतकऱ्यांना मातीचे नमुने कसे घ्यावे, नमुने घेताना काय काळजी घ्यावी व माती परीक्षण याचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले. तसेच मातीचे नमुने घेण्याच्या पद्धती आणि कोणत्या पिकासाठी कशाप्रकारे नमुने घ्यावे याचे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवले. कोणतेही पीक लावण्याआधी माती परीक्षण करणे हे कसे उपयोगी ठरते हे त्यांनी समजावून सांगितले. ज्यामध्ये आवश्यक तेवढेच खत, पाणी पिकाला दिले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याचा येणारा अधिक खर्च टाळता येईल हे कृषिकन्या प्राजक्ता कदम, श्रुती काळे, वैष्णवी खाडे, साक्षी खंडारे, मिनल कुवर यांनी शेतकऱ्यांना स्पष्ट केले. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. गोकुळ वामन, केंद्रप्रमुख व मृदा शास्त्र विषय तज्ञ डॉ. प्रेरणा भोसले, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. संदीप मोरे, कार्यक्रम अधिकारी व कृषि अर्थशास्त्र विषय तज्ञ डॉ. उत्कर्षा गवारे यांचे मार्गदर्शन यासाठी लाभले.


