कंपन्यांनी गावांचा विकास करावा
राजेंद्र शिंदे यांच्याप्रमाणे कार्पोरेट
कंपन्यांनी गावांचा विकास करावा
चंद्रकांत दळवी : भविष्यात निमगाव वाघा आदर्श गाव होणार
नगर प्रतिनिधी
पीआरएम सॉफ्ट सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी गावात स्वखर्चाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय बांधून विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. निमगाव वाघा गाव आता कार्पोरेट गाव म्हणून पुढे येत आहे. थोड्याच दिवसात राळेगण सिद्धी, हिवरेबाजार नंतर निमगाव वाघा हे आदर्श गावाचे विकासाचे मॉडेल म्हणून पुढे येईल. त्यांनी गावात स्वखर्चातून सुमारे दहा कोटी रुपयांची कामे केली. इतर कार्पोरेट कंपन्यांनीही शिंदे यांचा आदर्श घेऊन गावाशी नाळ जोडली तर ग्रामीण भागाचा विकास कामात मदत होईल असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व सेवानिवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी केले.
पीआरएम सॉफ्ट सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या आर्थिक सहकार्यातून सुमारे सात कोटी रुपये खर्च करून उभ्या राहिलेल्या नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्मश्री डॉ. पोपटराव पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, नंदुरबार येथील उपवनसंरक्षक संतोष सस्ते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, तहसीलदार संजय शिंदे, सहायक लेखाधिकारी रमेश कासार, पीआरएमच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी सुमन कुरेल, मुख्य रणनिती अधिकारी नितीन भराडीया, जनसंपर्क अधिकारी तबाजी कापसे, सरपंच उज्वला कापसे, उपसरपंच किरण जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र शिंदे यांच्या आई शालन काशिनाथ शिंदे, पत्नी सुनिता शिंदे यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
चंद्रकांत दळवी पुढे म्हणाले की निमगाव वाघा गावात बारा किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे लावणारे हे देशातील एकमेव गाव असावे. पद्मभूषण अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार यांनी लोकसभागातून गावांचा विकास केला. शिंदे यांनी स्वखर्चातून शाळेचा व गावाचा विकास केला. मी स्वतः निढळा (जि. सातारा) येथे प्रशासकीय काम करत असताना व सेवानिवृत्तीनंतर गावाचा विकास करत आहे. नगर झेडपीचे सीओ आनंद भंडारी हे आळेफाटा (जि. पुणे) येथे गावात विकासकामे करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आनंद भंडारी म्हणाले की, राजेंद्र शिंदे यांचे काम दीपस्तंभारखे आहे. शिंदे यांनी शाळा तसेच गावातील विकासासाठी शिंदे यांनी कौतुकास्पद काम केल्याबद्दल प्रशासनाच्या वतीने खूप आभार व्यक्त करतो. प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या साडेसहाशे शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. निमगाव वाघा गाव आता आदर्श गाव म्हणून पुढे येण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पोपटराव पवार म्हणाले की भविष्यकालीन संकटाचा संकटांचा विचार करून पुढील पंचवीस वर्षातील शिक्षणाचे धोरण बदलावे लागणार आहे मानवी जीवन संकटात आल्यामुळे पर्यावरणीय व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून शिक्षण पद्धती अंगी करावी लागणार आहे आनंदी जीवनासाठी शिक्षण पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे ज्ञान मंदिराला अध्यात्मिक मंदिराची गरज आहे.
राजेंद्र शिंदे म्हणाले की पीआरएम सॉफ्ट सोल्युशन्स कंपनी मधील सहकाऱ्यांच्या योगदानातून ही वस्तू उभी राहिली आहे विद्यार्थ्यांनी आयुष्यात हार या नावाचा शब्द ठेवायचा नाही. संघर्षातूनच जीवन घडते असे सांगितले.
शिक्षणाधिकारी पाटील म्हणाले की राजेंद्र शिंदे यांच्या दातृत्वातून निमगाव वाघा येथे राज्यातील भव्य दिव्य अशी पहिलीच शाळा उभी राहिली. जिल्ह्यात लोकसहभगातून सुमारे 63 कोटी रुपये खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक भरत पाटील व सहाय्यक लेखा अधिकारी रमेश कासार यांनी तर आभार गोकुळ जाधव यांनी मानले.
फोटो ओळी
नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे पीआरएम सॉफ्ट सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या आर्थिक सहकार्यातून सुमारे सात कोटी रुपये खर्च करून उभ्या राहिलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे उद्घाटन प्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, राजेंद्र शिंदे समवेत लेखाधिकारी रमेश कासार शिक्षण अधिकारी भास्करराव पाटील उपवनसंरक्षक संतोष सस्ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक पीआरपीएमच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी सुमन कुरेल मुख्य रणनीती अधिकारी नितीन भराडिया माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड जनसंपर्क अधिकारी तबाजी कापसे आदी.


