हिवरे बाजारमध्ये हरित क्रांतीचा नवा अध्याय
१८७६ दुर्मिळ देशी वृक्षांची लागवड
पर्यावरण, परंपरा, प्रेरणेचा संगम
सभापती प्रा. राम शिंदे यांची उपस्थिती
हिवरे बाजार : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या औचित्याने आणि “एक वृक्ष आईसाठी, एक वृक्ष देशासाठी” या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत आदर्श गाव हिवरे बाजार येथे मातृस्मृती वनमंदिरात रविवारी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते फणस व आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते बेहडा वृक्षाची रोपटी लावण्यात आले. कार्यक्रमाला आमदार काशिनाथ दाते, मा. जि.प. सदस्य वसंतराव चेडे, सुभाष दुधाडे,प्रल्हाद गीते सहा.तालुका पोलीस निरीक्षक यांच्यासह गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेतृत्व आणि कार्याचा गौरव
कार्यक्रमात बोलताना प्रा. राम शिंदे यांनी हिवरे बाजार व राळेगणसिद्धी या गावांचा उल्लेख “भारतातील ग्रामविकासाचे मॉडेल” म्हणून केला. ते म्हणाले, “देशाचा विकास ग्रामीण भागातूनच शक्य आहे. पोपटराव पवार यांनी आपल्या कार्यातून हे सिद्ध केले आहे.”ते पुढे म्हणाले की, “गेल्या ३५ वर्षांत हिवरे बाजारच्या विकासात योगदान देणाऱ्या लोकप्रतिनिधी,शासकीय यंत्रणा व पत्रकार यांच्या योगदानाची जाणीव ठेवून पुन्हा त्यांना आठवणीने बोलावून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करणे, त्यांचा सन्मान करणे, हे अत्यंत प्रेरणादायी आहे.”हा हिवरे बाजारचा गुण अंगिकारला पाहिजे याचे विशेष कौतुक केले.मी याअगोदर पण हिवरे बाजारला भेट दिली आहे.प्रत्येक भेटीच्या वेळेस हिवरे बाजार मध्ये नवीन उत्साह व उर्जा निर्माण होते याचे अनुकरण इतर गावांनी करण्याची गरज आहे.
१८७६ दुर्मिळ देशी वृक्षांची ऐतिहासिक लागवड
पद्मश्री पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून, या उपक्रमात १८७६ दुर्मिळ देशी वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या वृक्षारोपणामागे विविध ऐतिहासिक व सांस्कृतिक घटनांचे स्मरण ठेवण्यात आले आहे, जसे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती, संत ज्ञानेश्वर माऊली यांचा ७२५ वा संजीवन समाधी सोहळा, संत तुकोबारायांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा, भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव, अहिल्यानगर जिल्ह्यातील ५१ शूरवीर शहीद जवानांचे स्मरण
आमदार काशिनाथ दाते यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “हिवरे बाजार व राळेगणसिद्धी ही दोन आदर्श गावे माझ्या मतदारसंघात आहेत, याचा मला अभिमान आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने हिवरे बाजार ग्रामस्थांनी प्रा. राम शिंदे यांचा फेटा बांधून यथोचित सत्कार केला. या वृक्षारोपण सोहळ्याला सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे, उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर, दुध संस्थेचे चेअरमन बाबासाहेब गुंजाळ, , हरिभाऊ ठाणगे, एस.टी. पादीर, सहदेव पवार, दामोधर ठाणगे, बबन पाटील, संजय पवार, मंगेश ठाणगे (मेजर), राजू ठाणगे (मेजर)यांच्यासह गावातील महिला, युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


