काम सुरू झाल्याने खा. नीलेश लंके यांचे उपोषण मागे 

काम सुरू झाल्याने खा. नीलेश लंके यांचे उपोषण मागे 

प्रकल्प अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन

अहिल्यानगर : प्रतिनिधी 

     भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांच्या निर्देशानंतर ठेकेदाराने नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू केल्याने तसेच हे काम कालबध्द वेळेत पुर्ण करण्याचे लेखी आश्वासन पंदरकर यांच्या वतीने देण्यात आल्याने खा. लंके यांनी शुक्रवारपासून सुरू केलेले बेमुदत आंदोलन शनिवारी सायंकाळी मागे घेण्यात आले. 

     खा. लंके यांना देण्यात आलेल्या लेखी आश्वासनात नमुद करण्यात आले आहे की, या आंदोलनाची दखल घेत आम्ही या रस्त्याच्या ठेकेदाराला काम सुरू करण्याबाबत निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार ठेकेदाराने शनिवारी राहुरी फॅक्टरी येथे ड्रेनेजचे काम, शनिशिंगणापुर फाटा येथे मिलिंगचे काम तसेच मौजे देहरे येथे अंडरबायपासचे काम सुरू करण्यात आलेले आहे. मौजे कणगर आणि मौजे पिंपरी निर्मळ येथे  प्लॅन्ट उभारणी आणि यंत्र सामग्री व लॅबोरेटरी उभारण्यात आली असल्याचे या लेखी आश्वासनात नमुद करण्यात आले आहे. 

▪️चौकट

खा. लंके यांच्या सहकाऱ्यांकडून कामाची पडताळणी 

दरम्यान, खा. नीलेश लंके हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शुक्रवारी सायंकाळी प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी ठेकेदारास शनिवारी काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे शनिवारी सकाळपासून खा. लंके यांचे सहकाऱ्यांनी या रस्त्यावर प्रत्यक्ष काम सुरू झाले किंवा नाही याची पडताळणी केली. सहकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानंतर खा. लंके यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यास मान्यता दर्शविली. 

▪️चौकट

तर ठेकेदारावर दंडात्मक कारवाई

या प्रकल्पाचे काम सातत्याने सुरू राहील व विहित वेळेत पुर्ण केले जाईल असे प्रकल्प ठेकेदाराने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयास आश्वासीत केले आहे. हे काम वेळेत पूर्ण न झाल्यास ठेकेदारावर नियमोचित दंडात्मक कारवाई केली जाईल असेही लेखी आश्वासनात नमुद करण्यात आले आहे. 

चौकट 

◼️ठेकेदारास मुदतवाढ नाही ! 

     ठेकेदाराने काम सुरू करून कालबद्ध वेळेत पूर्ण करून देण्याचे आश्वासन सुरुवातीस देण्यात आले होते. मात्र वेळेत काम पूर्ण न झाल्यास ठेकेदारास मुदतवाढ देण्यात येणार नाही, याचा समावेश लेखी आश्वासनात हवा अशी मागणी खा. लंके यांनी यावेळी केली. त्यानंतर आश्वासनात ठेकेदारास मुदतवाढ देण्यात येणार नाही याचा उल्लेख त्यात करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *