हिवरेबाजारचे प्रयोग प्रशासनासाठी प्रेरणादायी!

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते देशी वृक्षांच्या लागवडीला सुरुवात

हिवरेबाजार : प्रतिनिधी

         हिवरेबाजार ग्रामस्थांनी श्रमदान व एकजुटीतून राबविलेले विकासात्मक प्रयोग प्रशासनासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरोद्गार  जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी व्यक्त केले.

          पर्यावरण संवर्धनासाठी ‘एक वृक्ष आईसाठी, एक वृक्ष देशासाठी’ या संकल्पनेतून हिवरेबाजार येथील मातृस्मृती वनमंदिर परिसरात विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटनांचे औचित्य साधून एकूण १८०० देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.पद्मश्री पोपटराव पवार यावेळी उपस्थित होते त्यांनी हिवरे बाजार येथे राबविलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

            या उपक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२५ वा संजीवन समाधी सोहळा, संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ वा वैकुंठगमन दिनानिमित्त तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव आणि प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवाचा समावेश होता. याच पार्श्वभूमीवर ‘शालेय रानमेवा अभियान’ ही संकल्पना देखील राबवण्यात आली.

         कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, आपण लोकसेवा आयोगाचा अभ्यास करत असताना पद्मश्री पोपटराव पवार यांचे कार्य पाहिले होते. मसुरीतील लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीत प्रशिक्षण घेत असताना त्यांनी हिवरेबाजारमधील कार्याची सादरीकरणासह माहिती दिली होती. आज प्रत्यक्ष हिवरेबाजारला भेट देऊन ते कार्य पाहता आले, हे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचे क्षण आहेत.”

          “गावातील प्रत्येक नागरिकाने एकत्रितपणे आरोग्य, शिक्षण, कृषी, जलसंधारण क्षेत्रात जे योगदान दिले आहे, त्यातून हिवरेबाजारचा समावेशक आणि शाश्वत विकास घडला आहे. हेच यशाचे खरे सूत्र आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

 हिवरेबाजार ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. या वेळी सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे, व्हा. चेअरमन रामभाऊ चत्तर, दुध संस्थेचे चेअरमन बाबासाहेब गुंजाळ, हरिभाऊ ठाणगे (सर), एस.टी. पादीर (सर), रो.ना. पादीर, मंडळ अधिकारी प्रताप कळसे (नेप्ती), तलाठी संतोष पाखरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *