नगर तालुक्यातील या गावात बिबट्याकडून घोड्याची शिकार !
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ; पिंजरा लावण्याची मागणी
नगर तालुका- नगर तालुक्यातील खोसपुरी येथे मंगळवार दि. १८ रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याकडून घोड्याची शिकार करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. खोसपुरी येथे पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खोसपुरी शिवारातील शेवगाव रस्त्याला म्हतारदेव त्रिपती देवकर यांचे घर आहे. त्यांच्या घराशेजारी गट नंबर ३३३ मध्ये घोडा करत असताना बिबट्याने हल्ला करून घोड्याची शिकार केली. परिसरात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याचे उसाच्या क्षेत्रात वास्तव्य असल्याचे दिसून येते.
उपवन संरक्षक सुवर्णा माने, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कृष्ण हिरे, वनरक्षक मनेष जाधव, वन कर्मचारी संजय सरोदे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. पशुधन विकास अधिकारी डॉ. सौ. प्रज्ञा कराळे यांनी घोड्याचे शवविच्छेदन केले. परिसरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत.
घोड्याची शिकार केली तो भाग सपाट असून लोकवस्तीत आहे. डोंगर नसलेल्या भागात बिबट्याने घोड्याची शिकार केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. घटनास्थळी सरपंच अविनाश आव्हाड, पोलीस पाटील अंबादास देवकर, भारत हारेर, भारत देवकर, बाळासाहेब देवकर यांनी भेट दिली.
_____________________
खोसपुरी परिसरात बिबट्याचे ठसे आढळून आलेले आहेत. परिसरातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी काळजी घ्यावी. लहान मुलांना एकटे सोडू नये. बिबट्याची छेड न काढता दिसल्यास तात्काळ वन विभागाची संपर्क साधावा.
……. सुरेश राठोड ( वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग)
_________________
खोसपुरी परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. सर्व ग्रामस्थांनी आपली व लहान मुलांची काळजी घ्यावी. वन विभागाच्या वतीने खोसपुरी येथे पिंजरा लावण्यात यावा.
…… अविनाश आव्हाड ( सरपंच, खोसपुरी)
_____________