अतुलनीय साहस दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यथोचित सन्मानाची आवश्यकता 

अतुलनीय साहस दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यथोचित सन्मानाची आवश्यकता 

आहिल्यानगर – २७ मे २०२५ रोजी अहिल्यानगर तालुक्यातील भोरवाडी, अकोळनेर,सोनेवाडी,जाधववाडी,खडकी ,वाळकी,शिरढोण या भागात ढग फुटी सदृश्य अती मुसळधार पाऊस झाला.यामुळे खडकी येथील वालूंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली होती. नदीकाठावरील सयाजी कोठुळे यांच्या वस्तीला वालूंबा नदीच्या पाण्याचा वेढा पडल्याने

एकाच कुटुंबातील दिपक सयाजी कोठुळे ,  संतोष सयाजी कोठुळे , ज्योती दिपक कोठुळे , कल्याणी ज्ञानदेव कोठुळे , श्रद्धा संतोष कोठुळे  महापुरात अडकले होते. यामधील ज्योती,कल्याणी आणि श्रध्दा या शेतातील ट्रॅक्टरच्या कलंडलेल्या ट्रॉलीच्या एका कोपऱ्यावर आधाराने कशाबशा  उभ्या होत्या.तर दीपक आणि संतोष हे एका विजेच्या खांबाच्या आधारावर होते. परिस्थिती अत्यंत भयावह होती.कोणत्या क्षणाला काय घडेल हे सांगणे अवघड झाले होते.अशा बिकट परिस्थिती मध्ये नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते आणि पोलीस कॉन्स्टेबल नितीन गांगर्डे यांनी अतुलनीय धाडस करत वाहत्या पाण्यामधून खडकी येथील पाच लोकांना वाचवले.नितीन गांगर्डे यांनी तर वाहत्या पाण्यात उडी घेत २०० मीटर पर्यंत पोहत जात दीपक आणि संतोष कोठुळे या भावांना वाचवले. खडकी येथील लोकांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते आणि त्यांचे कर्मचारी वाळकी आणि पुढे शिरढोण या गावी गेले. तेथील परिस्थीती पण फार बिकट होती.शिरढोण या गावी रात्री साडे आठ वाजता हरिश्चंद्र विठ्ठल वाघमारे , दिपक सोमनाथ खंडागळे , पिंकी दिपक खंडागळे ,मनिषा वाघमारे  यांना महापुरातून बाहेर काढण्यात आले. नगर तालुका पोलीस ठाण्याच्या इतर कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यांचीही कामगिरी यावेळी वाखाणण्याजोगीच होती.पण पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते आणि पोलीस कॉन्स्टेबल नितीन गांगर्डे यांनी दाखविलेल्या अतुलनीय सहसामुळे ९ जणांचे प्राण वाचले.

जीवाची पर्वा न करता कर्तव्य म्हणून अतुलनीय साहस दाखविणाऱ्या या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा प्रशासकीय पातळीवर यथोचित सन्मान व्हावा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार निलेश लंके,आमदार शिवाजीराव कर्डिले,आमदार काशिनाथ दाते, आमदार विक्रमसिंह पाचपुते,माजी आमदार बबनराव पाचपुते आणि अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या दोघांचे आणि नगर तालुका पोलीस ठाण्याच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *