हिवरेबाजारचे पर्यावरण संवर्धनाचे काम दीपस्तंभासारखे !
आनंद भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर
हिवरेबाजार : प्रतिनिधी
हिवरेबाजार येथे गुरुवार दि.५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने एक वृक्ष आईसाठी,एक वृक्ष देशासाठी मातृस्मृती वनमंदिर येथे संत श्री.ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२५ वा संजीवन समाधी सोहळा,जगदगुरु श्री.संत तुकोबारायांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती औचित्य साधून एकूण बेरीज १४०० देशी वृक्षांची लागवड शुभारंभ आनंद भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. दिनांक ५ जून ते ५ जुलै या कालावधीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले हिवरे बाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली सन १९८९ पासून १० लाख वृक्षांची लागवड करून संवर्धन करण्यात आले असून आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केलेली वृक्षलागवड हे पर्यावरण संवर्धनाचे दृष्टीने दीपस्तंभासारखे आहे असे उदगार श्री.आनंद भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी काढले.
यावेळी बोलताना आनंद भंडारी म्हणाले जागतिक तापमानवाढीची समस्या संपूर्ण जगाला भेडसावत असून परिणामी हिमशिखरे वितळून समुद्राकाठची शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केली आहे. मी प्रशासकीय सेवेत आल्याबरोबर कामाची सुरवात हिवरे बाजारपासून केली आहे.यापूर्वी हिवरे बाजारला ७ ते ८ वेळा भेट दिली असून हिवरे बाजारमधील झालेली विकासकामे लोकसहभागामुळे अतिशय गुणवत्तापूर्ण झालेली असून इतरांनी येथील विकासकामांच्या गुणवत्तेचा आदर्श घेण्याची गरज आहे. गावांसाठी आदर्शवत विकासकामे झालेली विकासकामातील सातत्यामुळे हिवरे बाजार हे विकासकामांची ग्रामपंढरी आहे. माझ्या २२ वर्षाच्या प्रशासकीय सेवेमध्ये हिवरे बाजारने ग्रामविकासाला दिशा दिलेली आहे.
पुढे बोलताना श्री.आनंद भंडारी म्हणाले केंद्रसरकारच्या मिशन लाईफ या प्रकल्पाची सुरवात हिवरे बाजारमधून करण्यात यावी.सध्या निसर्गाच्या शोषणामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढत आहे त्यासाठी कार्बन क्रेडीट संकल्पना राबविली पाहिजे.विजेचा कमीत कमी वापर करून अनावश्यक वेळी लाईट बंद करण्यात आली पाहिजे.राष्ट्रीय स्तरावरील अनेक धोरणात्मक बैठकीत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या समवेत निर्णय घ्यायला मिळाला त्यामुळेच हिवरे बाजारचे प्रतिबिंब देशभर पहायला मिळाले.निश्चितपणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या ग्रामविकासात हिवरे बाजारचे अतिशय मोलाचे योगदान आहे.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा फेटा बांधून व ‘बुद्धायन’ हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. बाबुराव जाधव गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अहिल्यानगर यांची बदली झाल्याबद्दल तसेच संजय पवार यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी दादाभाऊ गुंजाळ उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जि.प.अहिल्यानगर, दिलीप सोनकुसळे गटविकास अधिकारी पंचायत समिती अहिल्यानगर, अंबादास गारुडकर केंद्रप्रमुख,सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे, व्हा. चेअरमन रामभाऊ चत्तर, दुध संस्था चेअरमन बाबासाहेब गुंजाळ, हरिभाउ ठाणगे(सर), एस.टी. पादीर(सर), रो.ना.पादीर, बाबासाहेब जाधव मुख्याध्यापक जि.प.प्राथ.शाळा,मुरलीधर अमृते मुख्याध्यापक यशवंत माध्यमिक विद्यालय यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


