राहुरी तालुक्यात कर्डिलेंची भक्कम मोर्चेबांधणी, तनपुरे विरोधकांची मोट बांधण्यात यश
नगर: विधानसभा निवडणुकीत राहुरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी प्रचाराला वेग दिला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत आलेले अपयश धुवून काढण्यासाठी कर्डिले यांनी मागील वर्षभरापासून तयारी सुरू करीत मोर्चेबांधणी केली आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झालेले लाभ, दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना गायी म्हशी खरेदीसाठी मिळालेले कर्ज, महायुती सरकारच्या कल्याणकारी योजना तसेच कर्डिलेंचा गावागावात असलेला थेट जनसंपर्क जमेच्या बाजू मानल्या जातात. याशिवाय कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनीही युवकांचे संघटन उभे करून प्रचार यंत्रणा अधिक गतिमान केली आहे.
राहुरी – नगर – पाथर्डी विधानसभा मतदारसंघात यंदा भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात थेट लढत होत आहे. मागील निवडणुकीत तनपुरे यांनी कर्डिले यांचा पराभव करून धक्कादायक निकालाची नोंद केली होती. परंतु आता मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. कर्डिले यांनी गेल्या काही दिवसांत मतदारसंघात राष्ट्रवादीला खिंडार पाडत तनपुरे समर्थकांना भाजपमध्ये आणले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या साथीने कर्डिले एक एक डाव टाकून वातावरण बदलवत आहेत. राहुरी तालुक्यातील बडे नेते स्व. शिवाजीराव गाडे यांच्या समर्थकांनी या निवडणुकीत कर्डिलेंना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत. त्याचाही परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.
कर्डिले यांनी प्रचारा दरम्यान केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांसाठी किती महत्त्वाच्या ठरल्यात हे सांगण्यावर भर दिला आहे. स्थानिक मुद्द्यांना भाजप सरकारच्या निर्णयाची जोड देत त्यांनी जनमानसात बदलाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत राहुरी तालुक्यात कर्डिले यांना अपेक्षित साथ मिळाली नव्हती. त्यामुळे यंदा सुरूवातीपासूनच कर्डिले यांनी तालुक्यात भक्कम मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तालुक्यात सुरू असलेली विकासकामे आपल्या काळातच मंजूर झाली असून विद्यमान लोकप्रतिनिधी फक्त श्रेय घेण्यासाठी नारळ वाढवत असल्याचा दावा कर्डिले सातत्याने करीत आहेत. जनमत तयार करण्यासाठी भाजपसह मित्र पक्ष विशेष प्रयत्न करीत असल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.