गुणवडी – राळेगण हद्दीतील तलाव पूर्णपणे भरला , शेतकऱ्यांना मिळणार नवसंजीवनी…*
देविदास गोरे…
“रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील गुणवडी – राळेगण हद्दीतील तलाव पूर्णपणे भरला आहे.गेल्या चार – पाच वर्षापूर्वी हा तलाव भरला होता त्यानंतर चार पाच पाऊस समाधान कारक झालाच नाही.आता तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रुईछत्तिशी , गुणवडी , मठपिंप्री , अंबिलवाडी , वडगाव , हातवळण या गावातील जवळपास ९०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.सातत्याने दुष्काळाच्या छायेत येणारी ही गावे तलाव भरल्याने ओलिताखाली येणार आहेत.पावसाळयात पावसाच्या पाण्यावर अनेक पिके या भागात घेतली जातात पण उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते परिणामी रब्बी पिकांना देखील पाण्याचा अभाव जाणवतो.कांदा पिकाला हा तलाव कायम वरदान ठरतो.चार – पाच वर्षापासून या भागात कांदा , ऊस , गहू या पिकांना पाणी कमी पडते परिणामी उत्पन्नावर त्याचा खूप परिणाम होतो.नगर तालुक्यातील हा तलाव शेतकऱ्यांची संजीवनी म्हणून ओळखला जातो. चोहोबाजूंनी डोंगर असल्याने या तलावातील पाणी जिरण्याची प्रक्रिया खूप कमी आहे.तलावातून पाणी उपसा सिंचन खूप मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेजारील विहिरी , कूपनलिका यांना पाणी येण्यासाठी या तलावाचा उपयोग होतो.
कांदा , ऊस , गहू व फळबागा या भागात फुलणार आहेत.तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांना मोठी नवसंजीवनी मिळाली आहे.कांदा रोपे टाकण्याची लगबग आता सुरू झाली आहे त्यामुळे या भागातील कांदा लागवड क्षेत्र आता दुपटीने वाढणार आहे.शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या हा तलाव खूप महत्वाचा ठरतो.उन्हाळ्यात जी पाणीटंचाई जाणवते ती यंदा जाणवणार नाही आणि जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न मार्गी लागणार आहे त्यामुळे दूध व्यवसाय देखील जोरात चालणार आहे एकंदरीत तलाव भरल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.१९५२ साली काम पूर्ण झालेल्या या तलावाचा अनेक वेळा पांग फिटला आहे.१५ किमी पर्यंत गेलेला कॅनल मात्र पुन्हा दुरुस्त व्हावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे..