मुख्यमंत्र्याच्या शिंदे आडनावाचा पारगावला झाला असाही फायदा !
पारगावच्या मुलांच्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी बांधुन दिली शाळा : स्वातंत्र्यदिनी केले ऑललाईन उदघाटन
केडगाव : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नगर तालुक्यातील पारगाव ( भातोडी) येथील अधिकांश गावकरीही शिंदे आडनावाचे . गावाच्या शाळेची पडझड झाली . मुलांच्या बसण्याची गैरसोय होऊ लागली . मग मुलांनी आपण सर्व शिंदे व आपले मुख्यमंत्रीही शिंदेच आहेत . मग आपण त्यांनाच शाळा मागु . हा विचार करून निरागस मुलांनी थेट मुख्यमंत्र्याना पत्र लिहीले . आणि त्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना शाळा ही बांधुन दिली .
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी ऑनलाइन पद्धतीने नगर तालुक्यातील पारगाव येथील प्राथमिक शाळेचे उद्घाटन केले.
पारगाव हे नगर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव पण या गावाच्या प्राथमिक शाळेचे थेट मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करणे ही विशेष बाब आहे.
खरंतर मला पारगावला येऊन शाळेत उद्घाटन करायचे होते, परंतु व्यस्त कामकाजामुळे येऊ शकलो नाही, म्हणून ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करत आहे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. पारगाव मधील शाळेच्या विद्यार्थ्यांनी केवळ शिंदे आडनावाचे साधर्म्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्याना नविन शाळा बांधुन देण्याबाबत पत्र पाठवले. आमची जुनी शाळा जीर्ण झाली असुन ती आता वर्ग भरवण्याच्या स्थितीत राहिली नाही असं मुलांनी त्यांच्या पत्रात नमुद केले .मुख्यमंत्र्यानीही या पत्राची दखल घेतली हे विशेष . विद्यार्थ्यांची निरागस भावना लक्षात घेऊनच लवकरात लवकर पारगावला शाळा बांधुन द्या अशी सूचना मी प्रशासनाला केली असे मुख्यमंत्री शिंदे मुलांना म्हणाले . मुलांनी उच्च शिक्षण घेऊन राज्याचे व देशाचे नाव मोठे करावे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी विकास कामांसाठी पारगाव दत्तक घेतले. इतर अनेक भौतिक सुविधा पूर्णत्वाला येत आहेत परंतु पारगाव शहाजीराजांच्या ऐतिहासिक लढाईसाठी प्रसिद्ध आहे .म्हणून शहाजीराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी काही भरीव काम पारगाव मध्ये व्हावे अशी इच्छा मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. त्या कामीही आपण लक्ष देऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
व्याख्याते गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच मीनाक्षी शिंदे, उपसरपंच ताराबाई भोसले, शालेय समितीचे अध्यक्ष श्वेता ,ग्रामपंचायत सदस्य शोभा शिंदे, दादू जगताप, सुप्रिया शिंदे महेश शिंदे , छोटू भाई शेख, गावाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन होणे ही पारगावकरांसाठी ऐतिहासिक घटना आहे अशी भावना अनेक विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केली. शाळा व पारगावच्या इतर विकास कामांसाठी व्याख्याते गणेश शिंदे प्रयत्नशील असतात.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव आदर्श गावाकडे वाटचाल करत आहे. पारगाव च्या शाळेसाठी गणेश शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले. केवळ शालेय इमारतच नाही तर यापुढेही गुणवत्तापूर्ण शिक्षण मुलांना मिळावे यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार असल्याची भावना गणेश शिंदे यांनी व्यक्त केली.