जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेतील प्राध्यापक भरतीची चौकशी करा
सामाजीक कार्यकर्ते अमोल गाडे यांची मागणी : पोलिस अधिक्षकांना दिले निवेदन
केडगाव : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेमध्ये सहाय्यक प्राध्यापक भरती मध्ये फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असुन त्यामुळे संस्थेच्या विश्वस्तांमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर वाद उपस्थित झाला आहे . या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजीक कार्यकर्ते अमोल चंद्रकांत गाडे यांनी आज ( गुरुवारी ) जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे केली आहे .
याबाबत गाडे म्हणाले की ,
जिल्हा मराठा संस्थेच्या १९ पैकी १४ विश्वस्थांनी अविश्वास ठराव दाखल केल्याची बातमी प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाली . दि ४ ऑगस्ट २०२३ रोजी संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात मतदान घेण्यात आले .त्यावेळी १९ विश्वस्थ उपस्थित होते. यावरून असे स्पष्ट होते की , अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेमध्ये सहाय्यक प्राध्यापक भरती मध्ये फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. तरी वरील सर्व प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेमार्फत गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. माझे आजोबा स्व. बाबुराव यशवंतराव गाडे हे या संस्थेचे विश्वस्थ होते.तसेच संस्थेच्या विकासासाठी आमच्या गाडे परिवाराने स्वमालकीचा १ एकरचा अहमदनगर शहरातील भूखंड अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेस बक्षीसपत्र करून दिला आहे असे गाडे यांनी सांगितले .
वरील प्रकरणात मी फिर्यादी होण्यास तयार आहे. वरील प्रकरणात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गाडे यांनी निवेदनात केली आहे .