देविदास गोरे
दुग्ध व्यवसाय आला अडचणीत
जनावरांसाठी चारा डेपोची सोय करावी
कांदा , कापूस ,मका , सोयाबीन , बाजरी या पिकांवर झालेला हजारो रुपयांचा खर्च मातीमोल होणार आहे.
रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील रुईछत्तिशी , गुणवडी , मठपिंप्री , हातवळण , वाटेफळ , साकत , वडगाव परिसरातील पीके पावसाअभावी करपून चालली आहेत. खरिप हंगामातील पिके ऐन उभारित असताना पावसाने पाठ फिरवली आहे. मका , कापूस ,सोयाबीन , ऊस ,बाजरी या पिकांना पाण्याची गरज असताना लांबणीवर गेलेला पाऊस बळीराजासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.खरिप पिकांची पेरणी मोठया प्रमाणावर होऊन पिके खुरपणी साठी आली आहेत.काही पिकांची खुरपणी पूर्ण होऊन पिकांनी कात टाकली आहे. पाऊस नसल्याने पिके करपू लागली आहेत.शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतात लावलेला ऊस देखील करपू लागला आहे. त्यामुळे जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. विकत चारा घालण्याची वेळ आल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.पिकांवर पडलेला रोग , मजुरांची कमतरता यामुळे फवारलेले तणनाशक यामुळे शेतकऱ्यांना खूप आर्थिक खर्च आला आहे. त्यातून सावरण्यासाठी पावसाने साथ देणे गरजेचे आहे. पण आता पाऊस कधी येणार आणि पिके कधी जोम धरणार यात शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
१५ ऑगस्ट नंतर पाऊस जोर धरून पिके येतील असा हवामान खात्याचा अंदाज अपयशी ठरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय देखील मोठा तोट्यात सापडला आहे.कांदा , कापूस ,मका , सोयाबीन , बाजरी या पिकांवर झालेला हजारो रुपयांचा खर्च मातीमोल होणार आहे. सुरुवातीला चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी ही पिके पेरली.महिनाभर पिकांनी तग धरली पण आता पिकांची भूक वाढल्याने पावसाअभावी पिके सुकुन चालली आहेत.येत्या चार ते पाच दिवसात पाऊस आला नाहीतर शेतकरी आणि जनावरे यांचे हाल पहावणार नाहीत. सरकारने तात्काळ पिकांचे पंचनामे करुन अनुदान जाहिर करावे व जनावरांसाठी चारा डेपोची सोय करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे. माळराने ओसाड पडली असून गावोगावी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई देखील निर्माण झाली आहे.पाऊस पडला तर विहिरी , कूपनलिका यांना पाणी येऊन जनावरांची आणि नागरिकांची पाण्याची सोय चांगली होते.सध्या पाऊस नसल्याने जनावरे आणि नागरिक हवालदिल झाले आहेत.