हिवरे बाजारचे परिवर्तनशील कामे प्रेरणादायीब्रिगेडीअर रितेश बहल यांचे गौरोद्गार

हिवरे बाजारचे परिवर्तनशील कामे प्रेरणादायी
ब्रिगेडीअर रितेश बहल यांचे गौरोद्गार
नगर : प्रतिनिधी
“हिवरे बाजार हे भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आदर्श दिशा दाखवणारे गाव आहे. येथील मूलगामी आणि परिवर्तनशील कामे खरोखरच प्रेरणादायी आहेत. भविष्यातील तरुण पिढीसाठी तुम्ही रोल मॉडेल आहात.”असे गौरोद्गार ब्रिगेडीअर रितेश बहल यांनी व्यक्त केले.
आदर्श गाव म्हणून देश-विदेशात लौकिक मिळवलेल्या हिवरे बाजारला ब्रिगेडीअर रितेश बहल यांनी भेट देऊन ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांची पाहणी केली. त्यांच्यासमवेत कर्नल हिमांशू लक्षेद्र चौधरी,प्रभू तोजो,चरणजीत कौर,शरथ रामस्वामी,शिवानी,तूलिका उपस्थित होते.यावेळी ग्रामविकास, जलसंवर्धन, मृदसंधारण आणि गावाच्या सर्वांगीण परिवर्तनाबाबत झालेल्या सादरीकरणाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
गावातील स्वच्छता, शाश्वत विकास आणि सर्वसमावेशक उपक्रमांची पाहणी करताना ब्रिगेडीअर बहल भारावून गेले. “जगात असे गाव असू शकते याची जाणीव प्रत्यक्ष हिवरे बाजार पाहिल्यानंतर झाली. सक्षम नेतृत्व मिळाल्यास गावांचा कायापालट कसा होऊ शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे हिवरे बाजार,” असे त्यांनी नमूद केले.
पद्मश्री पोपटराव पवार यांनी प्रशिक्षण केंद्रावर गावाच्या ३५ वर्षांच्या विकासयात्रेचे माहितीयुक्त सादरीकरण केले. त्यानंतर यशवंत माध्यमिक विद्यालयातील एनसीसी विद्यार्थ्यांनी संचलन करत पाहुण्यांना मानवंदना दिली. पवार यांनी ब्रिगेडीअर बहल यांचा फेटा बांधून व श्रीफळ देऊन सन्मान केला.
उत्कृष्ट संचलनाबद्दल ब्रिगेडीअर बहल यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. “यशाची उत्तुंग शिखरे गाठायची असल्यास मेहनत आणि अभ्यास हा सततचा मंत्र असतो,” अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.या भेटीप्रसंगी सोसायटीचे चेअरमन छ्बुराव ठाणगे, एस.टी. पादिर, सहदेव पवार, राजू सहादू ठाणगे (मेजर), मंगेश ठाणगे (मेजर), ग्रामस्थ, पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *