पाऊस पडण्यासाठी महादेवाला महाजलभिषेक
नगर ब्रेकींग न्यूज- पाऊस पडण्यासाठी कामरगाव येथील ग्रामस्थानी गावातील महादेवाला महाजलभिषेक घालून साकडे घातले.
सध्या पावसाअभावी सर्वदूर पाण्याची व चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. विहरिंनी तळ गाठला असून. बोअरवेल कोरडेठाक पडले आहेत. खरीप हंगामातील शेतकऱ्यांची बाजरी, मुग, कपाशी, सोयाबीन, फुलशेती इत्यादी पिके हातातून गेली आहेत. त्यामुळे बळीराजावर अस्मानी व सुलतानी संकट ओढवले आहे.
या पार्श्वभूमीवर परतीचा पाऊस चांगला पडावा, ओढे, नाले, तलाव तुडुंब भरावेत व बळीराजाला सुखाचे दिवस येवो यासाठी नगर तालुक्यातील कामरगाव येथील ग्रामस्थांनी सरपंच तुकाराम कातोरे यांच्या संकल्पनेतून गावाचे आराध्य दैवत कामक्षा मातेच्या कृपाछत्राखाली पुरातन महादेव मंदिरातील नागनाथाला महाजलाभिषेक करण्यात आला. पुरोहित रामदास गंधे यांनी मंत्रोच्चार करीत पर्जन्य स्तोत्र पठण केले. नंतर गावातील स्त्री, पुरुष, तरुणांनी डोक्यावर पाण्याने भरलेले हंडे, बादल्या घेऊन नागनाथाचा गाभारा पाण्याने भरविला. हर-हर महादेवचा जयघोष करत ईडा-पिडा टळो, ओढे, नाले, तलाव भरो, बळीराजाला व त्यांच्या पशुधनाला सुखाचे दिवस येवो अशी आर्त हाक देण्यात आली.
या महाजलाभिषेकासाठी सरपंच तुकाराम कातोरे, शामराव आंधळे, शिवाभाऊ सोनवणे, अनिल आंधळे, विद्या महापुरे, बापू माउली, पोपट ठोकळ, राजेंद्र शिंदे, बबन चौधरी, संदीप लाळगे, विजयकुमार गुगळे, हाबू शिंदे, भीमाबाई आंधळे, शशिकला भुजबळ, कांता नानेकर, लता साठे, विशाल लाळगे, गेणू चौरे, राहुल शिंदे,प्रतिभा सोनवणे, कलावती खाडे, भीमराव सातपुते सह ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते संजय ठोकळ व अरविंद(गुड्डू) ठोकळ यांनी स्वखर्चाने टॅकरद्वारे पाण्याची उपलब्धता करून दिली.
पूर्वी पाऊस पडण्यासाठी ग्रामस्थ श्रद्धेने महादेवाला पाण्याने कोंडीत असत. त्यामुळे मुबलक पाऊसही पडत असे. तसेच गावाच्या शिवेपर्यत ग्राम दैवताच्या नावाने वाद्य वाजवून जयघोष करीत पावसाला आडवे जाण्याच्या कार्यक्रम करीत असत. त्यामुळे मुबलक आणी सर्वदूर पाऊस पडत असे, या पार्श्वभूमीवर पूर्वजांच्या आठवणी जतन करीत कामरगाव ग्रामस्थांनी केलेला उपक्रम स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे.