नवीन महसुल भवनातुन नागरिकांची कामे अधिक जलदगतीने होतील-ना.विखे पाटील*
*महसूल भवनाचे भूमीपूजन संपन्न*
अहमदनगर (प्रतिनिधी)
महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये नगर जिल्ह्यातच महसूल मंत्री पद होत मात्र या काळात जिल्ह्यासाठी कुठलेही विकास काम तसेच जनसामान्यांच्या हिताचे निर्णय याकाळात घेतल्या गेले नाही ही दुर्दैवाची गोष्ट असून मागील एकवर्षात राज्यात महायुतीचे सरकार आले आणि आम्ही निर्णयाचा धडाका लावला. हे गतिमान सरकार असून घरी बसून काम करणारे कोणी ही नाही त्यामुळे जनतेच्या प्रश्नाची जान असलेले हे सरकार आहे ते जनतेत जावून काम करते असे प्रतिपादन राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बाजुला 47 कोटी 86 लक्ष रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या महसुल भवन, या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपुजन पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले हे होते तर व्यासपीठावर महापौर रोहिणी शेंडगे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील आदीं यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्वसामान्य व्यक्तींचा महसुल विभागाशी सर्वाधिक संबंध येतो. नागरिकांना अत्यंत कमीवेळेत सेवांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा यासाठी महसुल भवनाच्या माध्यमातून सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यात येत आहेत. प्रशासकीय यंत्रणेमध्ये विकेंद्रीकरण येऊन प्रशासन अधिक लोकाभिमुख होऊन नवीन महसुल भवनातून नागरिकांची कामे अधिक गतीने होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महसुल विभागामध्ये एकसंघता येऊन जनतेची कामे वेगवान पद्धतीने व्हावीत, यासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेण्यात येत आहेत. मागच्या सरकार मध्ये ही आपल्या जिल्ह्याकडे महसुल विभागाचा कारभार होता परंतु तो फक्त वाळू साठीच कामाला आला अशी टीका करताना या विभागाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणे अपेक्षित होते मात्र पूर्वीचे मंत्री हे फक्त शोभेच्या बाहुल्या म्हणूनच मिरावले. सामान्य व्यक्तीस कार्यालयात न येता अत्यंत कमी वेळात व सुलभतेने मिळाव्यात यासाठी महसुल विभागाच्या सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वन अम्ब्रेला ॲडमिनिस्ट्रेशनवर भर देण्यात येत असुन जिल्ह्याच्या विकास आराखड्यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला अशाच प्रकारचे महसुल भवनाच्या उभारणीसाठी नियोजन करण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पूर्वी जमीनीची मोजणी पारंपरिक पद्धतीने केली जात होती. जमीन मोजणीसाठी नागरिकांना अनेक दिवस प्रतिक्षा करावी लागत होती. परंतू आधुनिक तंत्रज्ञनाचा वापर करत रोव्हर मशिनने जमीनीची मोजणी अत्यंत कमी वेळेत करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्याच्या समतोल विकासाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात उद्योगांची उभारणी करण्यावर भर देण्यात येत आहे. औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी शासनाची पाचशे एकर जमीन औद्योगिक वसाहतीला वर्ग करण्यात आली आहे. येत्या काळात जिल्ह्यात अधिकाधिक उद्योगांची उभारणी होऊन जिल्ह्यातील बेरोजगाराच्या हाताला काम मिळावे यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचेही ते म्हणाले.
जिल्ह्यात अनेक धार्मिक, पर्यटन व साहसी पर्यटन स्थळे आहेत. या स्थळांचा विकास केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. जिल्ह्यातील या स्थळांच्या विकास कामाला अधिक प्रमाणात गती देण्याच्या जिल्हा प्रशासनाला सुचना करत रोजगार निर्मितीला अधिक प्रमाणात चालना देण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत आपला जिल्हा सर्वाधिक दूध उत्पादन करणारा जिल्हा आहे. जिल्ह्यासह राज्यातील पशुधन वाचविण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे अशा शेतकऱ्यांना चारानिर्मितीसाठी मोफत बियाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आ.संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिध्दाराम सलिमाठ यांची समायोचीत भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, अहमदनगर शहर व ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची कामे या महसूल भवनाच्या एकाच छताखाली होणार आहेत. येत्या काळात 20 कोटी रुपये खर्चून सर्वसामान्यांची वाचनाची भूक भागावी यासाठी सुसज्ज अशा ग्रंथालयाचीही उभारणी करण्यात येणार आहे. सर्वांच्या सहकार्यातून अहमदनगर जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सर्वप्रथम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विधिवत पुजन व कोनशिला अनावरण करुन नूतन इमारतीचे भूमीपुजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
या भूमिपूजन समारंभास भाजप जेष्ठ नेते, पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.