शामराव पिंपळे यांची नगर तालुका भ्रष्टाचार
निर्मुलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड
नगर – वडगांव गुप्ताचे माजी सरपंच शामराव पिंपळे यांची नगर तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली असून, तसे पत्र नगर तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार संजय शिंदे यांनी दिले.
या नियुक्तीनंबर बोलतांना श्री.शामराव पिंपळे म्हणाले, या समितीच्या माध्यमातून विलंब, गैरव्यवहार, भ्रष्टाचाराच्या तक्रारींची दखल घेणे, कोठे भ्रष्टाचार होत असल्यास त्याच्या निर्मुलनासाठी उपाययोजना सूचविणे, प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचारास वाव राहू नये. सर्वसामान्य जनतेची कामे सहजगत्या कशा पद्धतीने होतील, यासाठी ही समिती कार्यरत असून, दर महिन्याला समितीच्यावतीने जनतेच्या तक्रारी ऐकून त्या स्विकारल्या जाणार आहेत. या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु, असे श्री पिंपळे यांनी सांगितले.
शामराव पिंपळे हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठवंत कार्यकर्ते असून, गेल्या 30 वर्षांपासून ते भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रीय आहेत. त्यांनी भाजपाच्या शाखाध्यक्ष पदापासून सुरुवात केली. त्यांनी 30 वर्षांच्या कार्यकाळात तालुकाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरिचटणीस, भाजपा जिल्हा चिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशा विविध पदावर चांगले काम केलेले आहे. त्यामुळे त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. तसेच तालुक्यातील सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमात ते नेहमी अग्रसर असतात. त्यांची शेतकरी, कष्टकरी, कामगार, गोरगरीब, सर्वसामान्यांशी नाळ जोडली आहे.
या निवडीबद्दल त्यांचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पा, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आ.प्रा.राम शिंदे, प्रदेश सदस्य प्रा.भानुदास बेरड, प्रदेश सचिव अरुण मुंढे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अॅ्ड.अभय आगरकर यांच्यासह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.