रुईछत्तिशी येथे मराठा आरक्षणासाठी तरुणांचे साखळी उपोषण , पंचक्रोशीतील तरुण सहभागी..
देविदास गोरे.
रुईछत्तिशी – संपूर्ण राज्यात सध्या मराठा आरक्षण मुद्दा गाजला आहे.मनोज जरांगे यांनी दुसऱ्या वेळेस उपोषणाला सुरुवात करून सरकारला धारेवर धरले आहे.जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे.मराठा आरक्षणासाठी रुईछत्तिशी येथे तरुण व ज्येष्ठ व्यक्ती एकत्र येत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला व उपोषणास आज सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषण सुरू करण्यात आले. पंचक्रोशीतील सर्व तरुण या उपोषणास पाठिंबा देऊन सहभागी झाले आहेत.गेल्या महिन्यापासून मराठा आरक्षण मुद्दा जोर धरत आहे यावर राज्य व केंद्र सरकार कोणतेही ठोस पाऊले उचलत नसल्याने मराठा समाज पुन्हा एकवटला आहे.
गावातील सर्व पदाधिकारी , ग्रामस्थ व इतर समाज यांनी उपोषणास पाठिंबा दिला आहे.जो पर्यंत जरांगे यांचे उपोषण सुरू आहे तोपर्यंत हे उपोषण चालू ठेवण्याचा तरुणांनी निर्णय घेतला आहे.अगदी लहान मुलांपासून ते वृध्द व्यक्तींपर्यंत हे साखळी उपोषण सुरू असल्याने नगर तालुक्यातील मराठा आरक्षणासाठी केलेले हे पहिलेच साखळी उपोषण आहे. गावोगावी पुढाऱ्यांना व नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.उठ मराठा जागा हो , आरक्षणाचा धागा हो या घोषणेने गावोगावी जोर धरला आहे.गावातील माता – भगिनी देखील या उपोषणात सहभागी झाल्याने तालुका प्रशासन लक्ष देऊन आहे.नगर तालुका पोलिस स्टेशन , नगर तालुका तहसीलदार व ग्रामपंचायत रुईछत्तिशी यांना निवेदन देऊन या उपोषणाची सुरुवात करण्यात आली आहे.प्रशासकीय नियमानुसार हे उपोषण सुरू आहे.नगर तालुका प्रशासनाने योगेश फुंदे व अनिल पवार यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे.