दुसऱ्याच्या झेंडयावर पंढरपूरची स्वप्ने पाहत नाही !

 दुसऱ्याच्या झेंडयावर पंढरपूरची स्वप्ने पाहत नाही !

 
आ. नीलेश लंके यांचा विखे पिता-पुत्रांना नाव न घेता टोला
नगर तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ 
नगर : प्रतिनिधी 
     आता त्यांना असे वाटू लागले आहे की राज्यच आपण चालवतोय की काय ! प्रशासनास धाक दाखवायचा. प्रशासनाचे लोक बळंच दडपशाही करून उभे करायचे. आणि सांगायचे की सांगा लोकांना आमची कामगिरी ! तुमचे काम आहे ना, तुम्ही मंजुर केले आहे ना, तुम्ही नारळ फोडा, आम्ही येणारही नाही. नीलेश लंके कधी दुसऱ्याच्या झेंडयावर पंढरपूरची स्वप्ने पाहत नाही. मी काम मंजुर केलंय तर मीच नारळ फोडणार. तुम्ही मंजुर केले तर तुम्ही फोडा. असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खा. डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता टोला लगावला. 
     नगर तालुक्यातील शिंगवे नाईक व नांदगांव येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आ. लंके यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, सरपंच सखाराम सरक, सेवा संस्थेचे चेअरमन नंदकुमार सोनवणे, सरपंच बाबा काळे  यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.  
     यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, माझं जाहिर आव्हान आहे. तुम्ही तुमच्या साडेचार वर्षातील कामाचा लेखाजोखा समोरासमोर घेउन बसा कागदोपत्री. मी माझ्या कामाचा लेखाजोखा घेऊन समोरासमोर बसतो. काहीतरी बातम्या छापून आणायच्या जिल्हा परिषदेच्या प्रशासकिय मंजुऱ्या घेउन जायच्या आणि सांगायचे हे काम तुझ्या गावचं. जिल्हा परिषदेचा आणि तुमचा काय संबंध ? जिल्हा परिषदेशी प्रताप पाटलांचा, बाळासाहेब हराळांचा, संदेश कार्ले, मोकाते अण्णा यांचा संबंध आहे.  तुमचा काडीचाही सबंध नाही तरीही सांगायचे आम्ही काम केले असे सांगत आ. लंके यांनी विखे पिता पुत्रांवर त्यांचे नाव न घेता हल्लाबोल केला.
  
▪️चौकट
स्वतः कोरडा पाषाण !
 
नगर मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेवरून आ. लंके यांनी खा. डॉ. विखे यांचे नाव न घेता चांगलेच सुनावले. मधल्या काळात कुठेतरी कामाला सुरूवात झाली, मात्र ते कामही बंद झाले. तुम्ही ज्या रस्त्याने घरी जाता तो रस्ता तरी करा ना आगोदर ! मग दुसऱ्यांना उपदेशाचे डोस पाजा ! स्वतः काहीच करायचे नाही. लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडा पाषाण !अशी त्यांची अवस्था असल्याचे लंके म्हणाले. 
▪️चौकट  
भुईदंडाने पाणी !
विखे पिता पुत्रांवर निशाणा साधताना आ. लंके म्हणाले, फक्त असे काही दाखवायचे की आम्ही पन्नास वर्षांपासून जिल्हयात सत्ता उपभोगतो आहोत. पन्नास वर्षापासून आम्ही जिल्हयात राजकारण करतो. पन्नास वर्षापूर्वी त्यांच्या कुटूंबातील सन्माननीय नेते मंडळींनी जी अश्‍वसाने दिली होती, तीच अश्‍वासने आजही आजही दिली जात आहेत. मला जुनी, जाणती मंडळी सांगतात, गावामध्ये भुईदंडाने पाणी आले पाहिजे असे सांगितले जात होते. आता भुईदंडाने नाही, पाटानेही नाही तर पाईपलाईनने पाणी आणू असे सांगू लागले आहेत. 
▪️चौकट
 काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे रहा 
फक्त आश्‍वसाने देऊन लोकांच्या डोळयात धुळ फेकण्याचे काम आपल्या जिल्हयात, तालुक्या-तालुक्यांमध्ये सुरू आहे. खोटी आश्‍वसासने देणारांवर विश्‍वास न ठेवता खरे काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. 
▪️चौकट
अमूक साहेबांच्या निधीतून काम मंजुर !
 
इकडे माझ्या पत्रावर जे काम मंजुर झाले त्याचे उदघाटन तिसरे लोक येऊन करून गेले. गावातही काही लोकांनी बोर्ड लावला की अमूक, तमूक साहेबाच्या निधीतून काम मंजुर. मंजुरीचे पत्र पहा, त्यावर धडधडीत माझं नाव आहे. आमदार नीलेश लंके यांच्या मागणीनुसार कामास मंजुरी देण्यात येत असल्याचे नमुद करण्यात आलेेले आहे. कामे आम्ही मंजुर करायचे, सध्या एक चालू आहे. स्वतःच्या निधीतून एक काम नाही. दुसऱ्याच्या कामाचं कसं श्रेय घेता येईल याची धडपड सुरू आहे. 
▪️चौकट 
 हे काम कधी मंजुर झाले साहेब !
पारनेर तालुक्यात जल जीवन  मिशन योजनेअंतर्गत पाणी योजनेच्या मंजुऱ्या मी घेतल्या. एक ठिकाणी हे महाशय नारळ फोडायला गेले. हे काम कधी मंजुर झाले साहेब ? तुम्ही कशाला जाता ? असा सवाल आ. लंके यांनी केला. 
▪️चौकट 
फुकटचेच नारळ आणि फुकटचेच काम !
पारनेर तालुक्यात पालकमंत्री साहेबांनी सब स्टेशनचे उदघाटन केले. महाविकास आघाडीच्या काळात उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून हे सबस्टेशन मंजुर झाले आहे. तुम्ही सब स्टेशनचा नारळ कुठे फोडता ? त्यांना भानच राहिले नाही, फुुकटचे नारळ गोळा करायचे, फुकटच्या कामावर जायचे आणि गावातल्या कार्यकर्त्यांना सांगायचे बोर्ड लावा ! कार्यकर्त्यांनीही बोर्ड लावण्यापूर्वी शहानिशा करायची ना ! शिंगवे ते वांबोरी रस्त्याचे कामही मीच मंजुर केले. त्याचे पत्रही माझ्याकडे आहे. त्याचेही श्रेय विरोध घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचा टोला आ. लंके यांनी लगावला. 
▪️फोटो ओळ
नगर तालुक्यातील शिंगवे व नांदगांव येथील विविध विकास कामांचा आ. नीलेश लंके व इतर मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *