निंबळक-राष्ट्रीय महामार्ग क्र- ५६१ (अहमदनगर -कडा -आष्टी -जामखेड) वरील पुलांची तात्काळ
दुरुस्ती, साईड पट्ट्यांची सफाई ,रिंग रोड क्रॉसिंग जवळ विद्युत व्यवस्था ,पथदिवे बसविणे व दिशादर्शक फलक लावणे बाबतचे निवेदन माजी सभापती प्रविण कोकाटे यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे उपअभियंता दिलीप तारडे यांना दिले.
राष्ट्रीय महामार्ग क्र- ५६१ ( अहमदनगर -कडा -आष्टी -जामखेड ) हा नगर तालुक्यातील निंबोडी- सारोळा बद्दी- टाकळी काझी-दशमीगव्हाण- चिचोंडी पाटील – आठवड या ६ गावांना जोडून बीड जिल्हा हद्दीत जातो. सदर महामार्गावर बऱ्याचशा समस्या निर्माण झालेल्या आहेत.
१) या रोडवर ठिकठिकाणी असणारे पुल हे खूप वर्षांपूर्वी झालेले असल्यामुळे त्यांचे आयुष्य कमी झालेले आहे .तसेच त्यावरील संरक्षक कठडे हे तुटल्यामुळे त्याच्यावरून होणारी वाहतूक अतिशय धोकादायक झालेली आहे. अपूर्वा कॉम्प्लेक्स निबोडी जवळ असणारा पुल, सारोळा बद्दी येथील गोदावरी लॉन्स जवळील पुल, दशमीगव्हाण येथील पुल यांच्यावर एका बाजूने कठडाच शिल्लक राहिलेला नाही, त्यामुळे कधीही अपघात होऊन खूप मोठी जिवितहानी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे कठडे बसविणे अत्यंत गरजेचे आहे.
ठिक ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यांची डागडुगी होणे गरजेचे आहे. साईड पट्ट्यांवर खुप मोठे गवताची झुडपे तयार झाली आहेत. त्यामुळे वाहन रस्त्यावरून खाली घेणे शक्य होत नाही तसेच बाजूंची गावे जोडणारी रस्तेही त्यामुळे लक्षात येत नाहीत, यामुळे दोन वाहनांची धडक होऊन खूप मोठा अपघात संभवू शकतो. त्यामुळे साईड पट्ट्याची सफाई करणे गरजेचे आहे.
३) नव्याने तयार झालेल्या रिंग रोड सारोळा बद्दी या गावाजवळ जामखेड रोडला क्रॉस होतो, त्या ठिकाणी कोणतेही दिशादर्शक फलक नाहीत. तसेच रात्रीच्या वेळी पुलाखाली खूप अंधारमय परिस्थिती आसते. नवीन वाहन चालकाला अंधारामुळे क्रॉसिंग लक्षात येत नाही. त्यामुळे उड्डाणपुला खाली विद्युत व्यवस्था करून पथदिवे लावणे व दिशादर्शक फलक लावणे खूप गरजेचे आहे.
आपण सदर निवेदनाची योग्य ती दखल घेऊन वर नमुद केलेल्या समस्यांचे तात्काळ निवारण करावे जेणेकरून अपघाताने होणारी जीवित हानी टाळणे शक्य होईल. अन्यथा अपघातामुळे उद्भवणाऱ्या संवेदनशील परिस्थितीस आपला विभाग जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.