कर्डीलेंच्या बालेकिल्ल्यात निलेश लंके यांचा तोफ डागत झंझावाती दौरा

 कर्डीलेंच्या बालेकिल्ल्यात निलेश लंके यांचा तोफ डागत झंझावाती दौरा

  जागोजागी पहाटेपर्यंत शेकडो  कार्यकर्ते वाट पहात जागेच
नगर तालुक्यातील सर्व मविआ नेते सहभागी
राहुरी तालुक्यानंतर आमदार लंके यांनी नगर तालुक्यातील मांजरसुंभा, पिंपळगाव माळवी, डोंगरगण, चाफेवडी, जेऊर, शेंडी,पोखर्डी, बुऱ्हाण नगर, कापूरवाडी, नागरदेवळे, दरेवाडी या भागात  झंझावाती दौरा केला. दुपारनंतर मांजरसुंभा पासून सुरुवात केल्यानंतर दरेवाडी या ठिकाणी पोहचेपर्यंत पहाटेचे 3 वाजले होते तरी जागोजागी शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते निलेश लंके यांची वाट पहात जागेच होते. हा भाग माजी आमदार कर्डीले यांचा बालेकिल्ला मानला जातो त्या भागातच निलेश लंके यांनी घणाघाती टीका केली त्यास उपस्थित लोकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवत प्रतिसाद दिला.
 ठिकठिकाणी  बोलताना निलेश लंके म्हणाले की ज्या लोकांनी आजवर दहशत आणि गुंडागर्दी जोरावर त्यांचे राजकारण केले त्यांची दहशत जनतेनेच मोडून काढली या भागातून त्यांना तडीपार केले.तेच आता माझ्यावर गुंडागर्दीचा आरोप करत आहेत.दूध वाल्यांचा आमदार कधी दुधाच्या कमी झालेल्या भावावर बोलला का ? यांचं म्हणजे अस म्हणावं लागेल की चोराच्या उलट्या बोंबा.. असे निलेश लंके कर्डीले यांचे नाव न घेता म्हणाले.
तर विरोधकांनी माझ्यावर टीका करण्या आधी शेतमालाचा कमी झालेला बाजारभाव, कांद्याची निर्यात बंदी आणि त्यामुळे शेतकऱ्यांना बसलेला फटका, दुधाचे कमी केलेले बाजारभाव, उच्च शिक्षण घेऊनही बेरोजगार असणारी तरुण पुढी यावर आधी बोलावे. प्रवरा कारखान्यातील 191 कोटींच्या घोटाळ्यावर बोलावे.
सर्वसामान्य मतदार आणि त्यांचे प्रश्न यावर बोलावे.
सर्वसामान्य घरात जन्माला आलो याचा मला अभिमान आहे. कारण सर्वसामान्य जनतेचे दुःख ,वेदना मी जगलो असल्याने त्या मला लवकर जाणवतात समजतात.मला त्यांचे प्रतिनिधीत्व  करायचे आहे आणि त्यांचे प्रश्न  संसदेत मांडायचे आहेत. 
यावेळी मविआचे गोविंद मोकाटे, रोहिदास कर्डीले, संदीप कर्डीले, संदेश कार्ले,बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, उद्धवराव दुसुंगे, भाऊसाहेब काळे,राजेंद्र भगत, रामेश्वर निमसे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *