भाजपचे नेते धर्म,जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहेत
ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे प्रतिपादन
श्रीगोंदे,प्रतिनिधी
काँग्रेसचा जाहिरनामा म्हणजे मुस्लिम लिगचा जाहिरनामा आहे. असे म्हणणे लांच्छनास्पद आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली जैश ए महंमदचा जाहिरनामा म्हणजे काँग्रेस आघाडीचा जाहिरनामा आहे असे म्हटले होते. जैश ए महंमद ही दहशतवादी संघटना आहे. अशा प्रकारे आपल्या विरोधकांची पाकीस्तानशी तुलना करणे,धर्म आणि जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे नेते करीत असल्याचे परखड प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी केले.
लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी गेल्या १ एप्रिलपासून स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू केली आहे.या यात्रेच्या माध्यमातून श्रीगोंदे तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन लंके नागरीकांशी संवाद साधत आहे. शनिवारी लंके यांच्या या यात्रेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनीही सहभाग नोंदवत काही सभांमधून आपले परखड मत मांडले. मा. आ. राहुल जगताप, बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, साजन पाचपुते यांच्यासह विविध गावांतील महाविकास आघाडी तसेच लंके समर्थक मोठया संख्येने उपस्थित होते.
देसाई म्हणाले, जे मस्तवालपणा करतात, त्यांच्या विरोधात आम्ही लढतो. आमच्या मागे मोठी आर्मी असते. सोशल मीडिया, फोनवरून धमक्या दिल्या जातात. अशा कोणत्याही धमक्यांना न घाबरता जी सत्याची बाजू आहे, गरीबाची बाजू आहे, शेतकऱ्याची बाजू आहे, जे जे त्यांच्या बाजूने उभे राहतात त्यांच्या मागेे उभे राहणे आमचे काम आहे.
मी आता नीलेश लंके यांच्याशी फाडफाड इंग्रजी बोलणार आहे. त्यांच्या आयुष्यात त्यांनी किती इंग्रजी शिकली ते कळेल. एक महिन्याची त्यांना मुदत देण्यात आली आहे. त्यांचा इंग्रजी भाषा आलीच पाहिजे. नाही तर त्यांची काही खैर नाही ! अशा प्रकारचे भाष्य आतापर्यंत कोणी केलं नव्हतं. जे राहुल गांधी फाड फाड इंग्रजीमध्ये बोलतात ते सामान्य माणसाशी हिंदीतच बोलतात. केरळमधील वायनाड मतदारसंघात स्थानिक भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात. अगदी श्रीमंत कुळात जन्माला आले आहेत तरीही त्यांची गरीबांशी नाळ जोडलेली आहे ते त्यांच्या भाषेत संवाद साधतात. ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे लोकांमधील मानसिक अंतर वाढविण्याचा प्रयत्न तेव्हा लोकांपासून दुर जाता असे हेमंत देसाई म्हणाले.
आमदार लंके म्हणाले की,प्रत्येक गावात जाऊन समस्या जाणून घेत आहे. निवडूण येणे सोपे आहे. मात्र त्यानंतर विकास कामे मार्गी लावणे ही परीक्षा आहे. २०१९ मध्ये ज्यांना तुम्ही खासदार म्हणून पाठविले ते पाच वर्षे तुमच्याकडे फिरकलेही नाहीत. माझ्या मतदारसंघात कोणत्या रस्त्याला खड्डा आहे, कुठे बंधाऱ्याची आवश्यकता आहे याची माहीती माझ्या डोळयापुढे असते. त्यांना सत्तेतून फक्त प्रतिष्ठा हवी आहे. माझ्या मते सत्तेचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी झाला पाहिजे असे नीलेश लंके यांनी यावेळी सांगितले.
▪️चौकट
दोन हजार कोटींची विकास कामे
काम करण्याची जिद्द, चिकाटी असेल तर कसे काम उभे राहते ते पारनेर-नगर मतदारसंघात पहा. मागील पंचविस वर्षाचा विकास व गेल्या साडेचार वर्षांचा विकास याची तुलना करा. तुम्हाला फरक कळेल. मतदारसंघाच्या विकासासाठी मी आहोरात्र परिश्रम घेतले. सुमारे दोन हजार कोटी रूपयांची कामे मार्गी लावली. प्रतिष्ठेसाठी, मोठेपणासाठी नाही तर सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी पदाचा वापर केला पाहिजे या भूमिकेतून मी काम करतो. तुम्ही एकदाच संधी द्या, तुम्हाला अभिमान वाटेल असे काम करून दाखविल अशी ग्वाही त्यांनी लंके यांनी दिली.
▪️