महाविकास आघाडीच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य नेहमीच प्रेरणादायी राहील – राणीताई लंके
नगर – भारतीय संविधाने शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचे बळ दिले. शिका आणि संघटीत व्हा या त्यांच्या संदेशाने बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचे कल्याण केले. त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील असामान्य कार्य आपणास नेहमीच प्रेरणादायी राहील. नागरिकांना एक मताचा समान अधिकार, सर्वांना स्वाभिमानाने जगण्याची, विकासाची समान संधी संविधानाद्वारे उपलब्ध करुन देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर युगपुरुष होते, असे प्रतिपादन जि.प.सदस्या राणीताई लंके यांनी केले.
महाविकास आघाडीच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जि.प.सदस्या राणीताई निलेश लंके, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम, संजय शेंडगे, अशोक गायकवाड, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, शाम नळकांडे, वसंत शिंदे, संजय गारुडकर, दत्ता जाधव, नलिनी गायकवाड, संग्राम कोतकर, परेश लोखंडे, योगिराज गाडे, गौरव ढोणे, सचिन शिंदे, फारुक रंगरेज, प्रशांत गायकवाड, दिपक भोसले, बबलू शिंदे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे कुठल्याही एका जातीच्या, धर्माच्या पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते तर अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमध्ये आहे. आपणही समाजात काम करतांना त्यांचे विचार आत्मसात करुन त्याप्रमाणे कार्य केल्यास समाजातील दु:ख दुर होण्यास मदत होईल, असे सांगितले.
याप्रसंगी अभिषेक कळमकर म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते एक प्रख्यात कार्यकर्ते आणि समाजसुधारक होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या आणि मागासवर्गीयांच्या उत्कर्षासाठी दिले. त्यांना समानतेचा अधिकार मिळवून दिला. आंबेडकर यांनी नेहमीच जातीभेद संपवण्यासाठी संघर्ष केला. त्यांचे काय सर्वांसाठी दिशादर्शक असेच आहे.
———