आघाडीचा धर्म पाळा !

 आघाडीचा धर्म पाळा !

उध्दव ठाकरे यांचा पारनेरच्या शिवसैनिकांशी संवाद
पारनेर येथे शिवसैनिकांचा मेळावा
पारनेर : प्रतिनिधी
     आताची लढाई माझी तुमची नाही. तुम्हाला सर्वांना माहीती आहे की ही लढाई राज्याच्या अस्मितीची आहे. देशाच्या लोकशाहीसाठीची आहे. कुठेही गडबड करू नका. गोंधळ करू नका. आघाडीचा धर्म पाळून आपल्याला लोकशाहीचे सरकार आणावे लागेल. मी तुम्हाला धन्यवाद देतो. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पारनेरच्या शिवसैनिकांना महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
        शिवसेना उपनेते तथा  महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखे यांना पाठींबा देण्याचा परस्पर निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र उध्दव ठाकरे यांचा आदेश शिरोधार्ह मानण्याचा निर्णय घेत सर्व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परीषदेत तशी भुमीका मांडली. त्यानंतर शनिवारी जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीमध्ये पारनेर शहरातील सेनापती बापट सभागृहात शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यादरम्यान उध्दव ठाकरे यांनी तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्याशी संपर्क करून शिवसैनिकांशी संवाद साधला.
        या मेळाव्यासंदर्भात बोलताना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी सांगितले की, मेळाव्यात विविध शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार आपला पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याने आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत. येत्या दोन-तीन दिवसांत तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून या मेळाव्यास पक्षाचे राज्य पातळीवरील ज्येष्ठ नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याचे नियोजनही या बैठकीत करण्यात आल्याचे डॉ. श्रीकांत पठारे यांनी सांगितले.  
        जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रवी वाकळे, तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, महिला आघाडी तालुका प्रमुख प्रियंका खिलारी, युवासेना तालुकाप्रुख अनिल शेटे, डॉ. भास्कर शिरोळे, नगरसेवक राजू शेख, बाजार समितीचे संचालक  किसन सुपेकर, तालुका संघटक अमोल गजरे यांच्यासह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
▪️चौकट
औटी यांच्यावरील कारवाईबाबात अनभिज्ञ
विजय औटी २० वर्षे शिवसेना चांगल्या पध्दतीने सांभाळली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी विकास कामेही मार्गी लावली. तालुक्यात चांगल्या पध्दतीचे वातावरण होते. त्यांनी विखे यांना का पाठींबा जाहिर केला ? कशामुळे केला हे माहीती नाही. ते हुशार व्यक्तीमत्व आहे. ते कालही, आजही, उद्याही आमच्यासाठी मार्गदर्शक राहतील. त्यांच्याविषयीचा आदर कमी होणार नाही.औटी यांच्यावरील कारवाईबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. पक्षाने आमच्या परस्पर त्यांच्यावर कारवाई केलेली असल्याचे डॉ. श्रीकांत पठारे यांनी सांगितले.
▪️चौकट
शिवसैनिकांकडून लंके यांचा प्रचार सुरू  
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारात सर्व शिवसैनिक सहभागी झाले आहेत. वाडया वस्त्यांवर शिवसैनिक फिरू लागले आहेत.  असे पठारे यांनी सांगितले.
▪️ चौकट
 हॉल अपुरा
विजय औटी यांनी डॉ. विखे यांना पाठींबा देण्याचा परस्पर निर्णय घेतल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची ताट होती. त्याचा प्रत्यय या मेळाव्याच्या निमित्ताने आला. शहरातील बापट स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यासाठी मोठया संख्येने शिवसैनिकांनी हजेरी लावल्याने हॉल अपुरा पडला. त्यामुळे बाहेर उभे राहून शिवसैनिकांनी मेळाव्यातील भाषणे ऐकली.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *