मिरवणारी डिग्री मेरीटची की पेमेंट सिटची ?
डॉ. अमोल कोल्हे यांचा डॉ. सुजय विखे यांना सवाल
बेलवंडी येथे नीलेश लंके यांची प्रचार सभा
श्रीगोंदे : प्रतिनिधी
भाषा येत नाही म्हणून कोणी टीका करत असेल तर मिरवणारी डिग्री ही मेरीटची की पेमेंट सिटची हा निकष लावायचा का ? असा सवाल शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी खा. डॉ. सुजय विखे यांना केला.
नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ बेलवंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत डॉ. कोल्हे हे बोलत होते.
खा.कोल्हे म्हणाले, एकीकडे पाच पिढयांचे राजकारण असताना एका सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा उभा रहतो. विचारावर विश्वास ठेऊन लोकशाही टिकविण्यासाठी थेट आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार होतो हे महत्वाचे आहे. जेंव्हा योध्दा शस्त्र टाकत नाही, शरण येत नाही तेंव्हा तो घेरला जातो तेंव्हा त्याला बदनाम केले जाते अशा परिस्थितीत तुम्ही लढण्याची उमेद ठेवता ही महत्वाची गोष्ट आहे.
डॉ. कोल्हे म्हणाले, खरे तर नगर दक्षिणमध्ये माझ्यावर टीका करण्याचे कारण नाही. तरीही टीका केली की अमोल कोल्हे घोडयावर दिसले, संसदेत घोडयावर दिसले, महानाटयात घोडयावर दिसले. घोडयावर बसल्यावर तुम्हाल एवढा त्रास होतो. तुम्ही थट्टा करता. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन नाही जन्माला आलो. आम्हाला कष्ट करावे लागतात. तेंव्हा आमच्या घरातली चुल पेटते यात आमचा दोष काय ? आमच्या पाच, पाच पिढया राजकारणात नाहीत. मेडिकलला प्रवेश घ्यायचा होता त्यावेळी रात्र रात्र अभ्यास करावा लागला. ९७.३३ टक्के मार्क मिळवावे लागले. आम्हाला कोणी पेमेंटची सिट खैरातमध्ये वाटली नाही. पदव्युतर शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागली. तुमच्या सारखे पेमेंट सिटमधून सरळ नाही. कोणी आम्हाला सिट दिली नाही. जे केवळ मोठया घरात जन्म घेतल्याचं समाधान मिळते त्यावरून तुम्ही टीका करत असाल तर त्याचे आम्हाला वाईट वाटत नाही. कारण ऐंशी टक्के जनता आमच्या सारखी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आणि हिमतीवर जगत असते असे डॉ. कोल्हे यांनी डॉ. विखे यांना सुनावले.
मा. आ. राहुल जगताप, राजेंद्र फाळके, घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, सुनंदा पाचपुते, सुनील गव्हाणे, राजेंद्र आघाव, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, हरिदास शिर्के, प्रशांत दरेकर, अनिल कोकाटे, स्मितल वाबळे, मनोहर पोटे, संपत म्हस्के, अनिल वीर, रमेश खोमणे यांच्यासह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
▪️चौकट
पुढाऱ्यांच्या हाती निवडणूक राहिली नाही
४० वर्षे निवडणूका पाहतोय. ही निवडणूक आमच्या पुढाऱ्यांच्या हातात राहिली नसून मतदारांनी हाती घेतली आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वीच चारशेच्यावर गावांमध्ये जाऊन तेथील प्रश्न त्यांनी समजून घेतले आहेत. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालकांच्या याद्या तयार करण्यात आल्या असून अर्थकारणाचे अश्र काढण्याचा प्रयत्न होणार आहे. मतांची ही रास सांभाळण्याची जबाबदारी आपणा सर्व कार्यकर्त्यांची आहे.
बाबासाहेब भोस
ज्येष्ठ नेते
▪️चौकट
१५ मे रोजी दुध, कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन
१३ मे रोजी मतदान झाल्यानंतर १५ मे रोजी आपण दूध व कांदा दरासाठी मोठे आंदोलन करणार आहोत. दरवाढ करा अन्यथा मंत्र्यांनी महाराष्ट्रात फिरू देणार नाही. दरवाढ करा अन्यथा आम्हाला तुरूंगात टाका अशी भूमिका घेत किमान एक लाख आंदोलकांना तुरूंगात घेऊन जाणार असल्याचे लंके यांनी जाहिर केले.